
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : शासकीय नियमांचे उल्लंघन आणि धान्यामध्ये मोठी अफरातफर केल्याप्रकरणी भंडारा जिल्हा पुरवठा विभागाने तुमसर येथील एका रास्तभाव दुकानदारावर मोठी कारवाई केली आहे. मालवीय नगर, तुमसर येथील दुकानदार अनिल रामकृष्ण साकुरे यांचे दुकानाचे प्राधिकारपत्र (परवाना) कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, त्यांना ३४,५५५ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी २० मार्च २०२६ रोजी हे आदेश निर्गमित केले.
संबंधित रास्तभाव दुकानात होत असलेल्या गैरप्रकारांबाबत स्वराज्ययुवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. मेश्राम यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच या दुकानाच्या कारभाराची चौकशी सुरू झाली आणि अखेर ही मोठी कारवाई करण्यात आली. फेब्रुवारी २०२६ मध्ये तक्रारीच्या अनुषंगाने निरीक्षण अधिकारी, तुमसर यांनी अनिल साकुरे यांच्या रास्तभाव दुकानाला भेट दिली होती. या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या.
साठ्यात तफावत : प्रत्यक्ष तपासणीत १.१६ क्विंटल गहू कमी, तर ६.८६ क्विंटल तांदूळ जास्त आढळला. साखरेच्या साठ्यातही घट दिसून आली. अभिलेख अपूर्ण : दुकानात विक्री रजिस्टर, साठा रजिस्टर, तक्रार पुस्तिका आणि युनिट रजिस्टर यांसारखे महत्त्वाचे दस्तऐवज उपलब्ध नव्हते. पावतीचा अभाव : लाभार्थ्यांना धान्य वाटप केल्यानंतर ई-पॉस मशीनची पावती दिली जात नव्हती. वेळेचे उल्लंघन : दुकान शासननियमानुसार उघडले जात नसल्याचेही निदर्शनास आले. प्रशासकीय कारवाईचा बडगा… जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी दुकानदाराचा खुलासा फेटाळून लावत ‘महाराष्ट्र अनुसूचित वस्तू (वितरणाचे विनियमन) आदेश १९७५’ नुसार कडक आदेश दिले आहेत: परवाना रद्द : अनिल रामकृष्ण साकुरे यांचा रास्तभाव दुकानाचा परवाना तात्काळ रद्द. अनामत रक्कम जप्त : दुकानाची संपूर्ण अनामत रक्कम शासनजमा. आर्थिक दंड : गव्हाचे ३,०३३ रुपये, तांदळाचे ३१,५२१ रुपये आणि साखरेचे ३९६ रुपये, असा एकूण ३४,५५५ रुपये दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहे. ग्राहकांसाठी पर्यायी व्यवस्था… सदर दुकान रद्द झाल्यामुळे या दुकानाला जोडलेल्या शिधापत्रिका धारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नजीकच्या रास्तभाव दुकानाला या पत्रिका जोडण्याचे निर्देश तहसीलदार, तुमसर यांना देण्यात आले आहेत.