
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : श्रीराम नवमीच्या पावन निमित्ताने भंडारा शहरात भक्तिमय वातावरणात भव्य दिव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली. भंडारा शहर श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत हजारो रामभक्तांनी सहभाग घेतला. सायंकाळी काढण्यात आलेल्या या भव्य शोभायात्रेत विविध आकर्षक झाक्या (झांकी) सादर करण्यात आल्या. भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या देखाव्यांनी उपस्थितांचे मन मोहून टाकले. तसेच विविध सामाजिक संदेश देणाºया झाक्यांमधून एकता, बंधुता आणि संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला. संपूर्ण भंडारा शहर “जय श्रीराम”च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांनी सजलेल्या या शोभायात्रेमुळे शहरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. या रॅलीत नागरिक, महिला, युवक आणि बालकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. एकूणच, श्रीराम नवमी निमित्त आयोजित ही शोभायात्रा भंडारा शहरासाठी भक्ती, एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक ठरली.