
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील खापा चौफुली सध्या अपघातांचे ‘हॉटस्पॉट’ म्हणून ओळखली जात असून, मंगळवारी दुपारी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सने उभ्या असलेल्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरातील अतिक्रमणाचा आणि वाहतुकीच्या विस्कळीतपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार ३१ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तुमसर आगाराची एसटी बस (क्र. एमएच १४ केक्यु ८६७३) प्रवाशांना घेण्यासाठी खापा चौफुली येथील बस स्टॉपवर उभी होती. याचवेळी गोंदियाकडून मौद्याकडे भरधाव वेगाने जाणाºया एका खासगी ट्रॅव्हल्सने (क्र. एमएच ०४ एफके ११२०) उभ्या असलेल्या एसटी बसला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की एसटी बसच्या मागील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. खापा चौफुली हे रामटेक-गोंदिया आणि भंडारा-बालाघाट या महामार्गांना जोडणारे मुख्य केंद्र आहे.