
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : विदर्भातील प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गा माता मंदिर परिसरात मागील सहा महिन्यांपासून एका अस्वलाने ठाण मांडले आहे. विशेषत: ३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता हे अस्वल मंदिर परिसरात उजळ माथ्याने वावरताना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, अस्वलाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरचप्राड येथील पहाडीवर अस्वलाचा वावर वाढल्याने दररोज दर्शनासाठी येणाºया शेकडो भाविकांमध्येदहशतीचे वातावरण आहे. या अस्वलाने आता केवळ वावरच नाही, तर धुमाकूळ घालण्यासही सुरुवात केली आहे. मंदिर परिसरातील पूजेच्या साहित्यांच्या दुकानांची या अस्वलाने नासधूस केली असून, खाद्याच्या शोधात ते दुकानांचेनुकसान करत आहे. अस्वलाच्या भीतीमुळे कधीकाळी रात्री उशिरापर्यंत गजबजलेला हा परिसर आता सायंकाळी ६ वाजताच निर्मनुष्य होत आहे. या पहाडीवर खूप दाट जंगल नसल्याने अस्वल थेट मानवी वावराच्या ठिकाणी, म्हणजेच मंदिर परिसरात सहज पोहोचत आहे. अशा स्थितीत एखादी मोठी दुर्घटना घडण्याची किंवा अस्वलाने भाविकांवर हल्ला करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. “आम्ही वारंवार विनंती करूनही वनविभाग झोपलेले आहे का? एखादा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का?” असा सवाल नागरिक आणि भाविक उपस्थित करत आहेत.