
पहाटे आईसमोरच बिबट्याची झडप; विटाभट्टी परिसरातील मका पिकांमुळे वाढला धोका
वनविभागाकडून 6 पिंजरे, कॅमेरे बसवून शोधमोहीम तीव्र; सलग घटनांमुळे नागरिक भयभीत
साकोली (दि. 15 एप्रिल) – साकोली तालुक्यातील विर्शी येथे पहाटेच्या सुमारास घडलेल्या हृदयद्रावक घटनेत बिबट्याने अवघ्या 5 वर्षीय अंशिका काशीनाथ मिरी हिला आईसमोरच ओढून नेत ठार केल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. विटाभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील या निष्पाप बालिकेचा बळी गेल्याने भीतीचे सावट अधिक भयंकर झाले असून, सलग वन्यप्राणी हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंशिका मिरी (वय 5, रा. सुहेला, जि. बलोदाबाजार, छत्तीसगड) ही आपल्या कुटुंबासह संजय कापगते यांच्या शेतातील विटाभट्टीवर राहत होती. बुधवारी पहाटे सुमारे 5 वाजताच्या दरम्यान ती आईसोबत शौचालयासाठी गेली होती. परतीच्या वाटेवर आई पुढे चालत असताना अंशिका काही अंतराने मागे येत होती. याच वेळी शेजारील मक्याच्या दाट शेतातून अचानक बिबट्याने झडप घालत अंशिकाला ओढून नेले. आईच्या आरडाओरडीनंतर कुटुंबीयांनी धाव घेत बिबट्याला हाकलून लावले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन कटरे, पोलीस निरीक्षक आचरेकर यांच्यासह वनविभाग व पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह साकोली उपजिल्हा रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले व नंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

वनविभागाने तत्काळ मदत म्हणून 20 हजार रुपये दिले असून, मृतदेह स्वगावी नेण्यासाठी 25 हजार रुपयांचा रुग्णवाहिका खर्चही उपलब्ध करून दिला आहे. मात्र, या आर्थिक मदतीपेक्षा कुटुंबावर कोसळलेले दु:ख अधिक मोठे असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, विटाभट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेल्या मक्याच्या पिकांमुळे बिबट्याला लपण्यासाठी योग्य अधिवास मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित बिबट ही मादी असून तिच्यासोबत दोन पिल्ले असल्याची माहिती समोर आल्याने धोका आणखी वाढला आहे.

घटनेनंतर वनविभागाने तातडीने 6 पिंजरे व अनेक कॅमेरे लावून बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. साकोली तालुक्यातील ही चौथी घटना असून, यापूर्वीच्या घटनांशी थेट संबंध नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
यापूर्वी 19 मार्च रोजी बांपेवाडा येथे नरभक्षक टी-20 वाघिणीने वसंत मेश्राम यांचा बळी घेतला होता. त्यानंतर 28 मार्च रोजी उमरझरी येथे माया सोनवाने यांचा मृत्यू झाला, तर 1 एप्रिल रोजी आमगाव येथे छाया मुंगमोडे या जखमी झाल्या होत्या. या सर्व घटनांमुळे वनविभागाने 170 हून अधिक कर्मचारी, 90 कॅमेरे व 8 ठिकाणी पिंजरे लावून मोठी शोधमोहीम सुरू केली आहे.
सलग होत असलेल्या वन्यप्राणी हल्ल्यांमुळे साकोली परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असले तरी, प्रत्यक्षात ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न समोर आणला असून, प्रशासनाने तातडीने दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची गरज आहे.