महापुरुषांच्या विचारातून राष्ट्र उभारणीचा संकल्प – डॉ. शैलेंद्र लेंडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा जपत, महावितरण आणि महापारेषण नागपूर परिमंडळातील सर्व कामगार संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. २३) एका भव्य संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गड्डीगोदाम येथील महावितरण शहर मंडळाच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेला हा सोहळा वैचारिक प्रबोधन आणि सामाजिक बांधीलकीचा एक अनोखा संगम ठरला.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे उपस्थित होते. आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “आजच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत राष्ट्राची उभारणी आणि सर्वांगीण विकासासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची व विचारांची सांगड घालणे ही काळाची गरज आहे. या महापुरुषांचे विचार केवळ पुस्तकात नसून ते जगण्यात उतरवणे आवश्यक आहे.” या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापारेषण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश अणे होते. प्रमुख अतिथी म्हणून महावितरण नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

महावितरणचे कार्यकारी अभियंता हेमराज ढोके यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रगत विचारांनी आधुनिक भारताची पायाभरणी कशी केली, यावर प्रकाश टाकला. रक्तदानातून महापुरुषांना मानवंदना केवळ भाषणे न करता सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी महावितरणच्या नागपूर शहर मंडळातर्फे ‘प्रकाश भवन’ येथील लघु प्रशिक्षण केंद्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मानवतावादी उपक्रमाचे उद्घाटन सिव्हील लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता धम्मदीप फुलझेले यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात सामाजिक ऊर्जेचा प्रत्यय आला, जेव्हा २५ पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाºयांनी स्वेच्छेने रक्तदान करून महापुरुषांच्या विचारांना कृतीची जोड दिली.

शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलताना अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी रक्तदात्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि अशा उपक्रमांमुळे समाजातील अत्यंत गरजू आणि गरीब रुग्णांना जीवदान मिळते.” या शिबिरासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तांत्रिक सहकार्य केले. या भव्य सोहळ्याला कार्यकारी अभियंता राहुल जिवतोडे, धम्मदीप फुलझेले, समीर टेकाडे, स्वप्निल गोतमारे यांच्यासह महावितरण व महापारेषणचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि अभियंता मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशांत शृंगारे यांनी केले, तर सूत्रसंचालन आनंद कांबळे यांनी प्रभावीपणे सांभाळले. शेवटी सुभाष मुळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश अंबादे, आशिष सोमकुंवर, प्रमोद मेश्राम, अब्दुल सादिक, राजेश पोफळी, अमरदीप बागडे, नरेंद्र तिजारे, योगेश विटनकर, मनोज मेश्राम, संतोष हिरुळकर, रमेश वाटकर, कमलेश मांडवगडे आणि स्वाती फाटे यांसह सर्व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *