लाखोंचा महसूल बुडवून नैसर्गिक टेकड्या उध्वस्त दावेझरीच्या मुरूम माफियावर कारवाई कधी?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात राजकीय वरदहस्ताने सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननाचे प्रकरण आता तापले आहे. भाजप पदाधिकारी आणि मुरूम माफिया बुधराज पटले याने मिटेवाणी व दावेझरी शिवारात केलेल्या कोट्यवधींच्या अवैध उत्खननाची ‘सीआयडी’ (उकऊ) मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा आरोप…

निवेदनात नमूद केल्यानुसार, तुमसरकटंगी आंतरराज्यीय मार्गावरील मिटेवाणी आणि दावेझरी परिसरात मागील महिन्याभरापासून जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या सहाय्याने सुमारे २ ते अडीच हजार ट्रॅक्टर मुरुमाचे अवैध उत्खनन करण्यात आले. विशेष म्हणजे, तहसील प्रशासनाने यासाठी कोणतीही अधिकृत लीज (परवाना) दिलेली नव्हती. संशयित आरोपी बुधराज पटले हा सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असून त्याची पत्नी पंचायत समिती सदस्य आहे. राजकीय दबावामुळेच स्थानिक महसूल प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप अमित मेश्राम यांनी केला आहे.

नैसर्गिक टेकड्या उध्वस्त करून जमवली कोट्यवधींची माया

या मुरूम माफियाने निसर्गाचा ºहास करत मिटेवाणी व दावेझरी येथील नैसर्गिक टेकड्या उध्वस्त केल्या आहेत. प्रति ट्रॅक्टर एक हजार रुपये दराने मुरुमाची विक्री केली जात असून, तुमसर येथील एका खाजगी मंगल कार्यालयाला ३०० ट्रॅक्टर मुरूम विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अवैध व्यवसायातूनआरोपीने जेसीबी, पोकलँड आणि ट्रॅक्टर खरेदी करून कोट्यवधींची अवैध मालमत्ता जमा केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पालकमंत्र्यांच्या नावाचा वापर?

बुधराज पटले हा स्वत:ला जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा आणि पालकमंत्र्यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगून प्रशासनावर दरारा निर्माण करतो, अशीही चर्चा परिसरात आहे. महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवूनही अद्याप कोणतीही कठोर कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनने दिला आहे. या प्रकरणाकडे आता राज्य शासन काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *