
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा वन विभाग कार्यालयासमोरील कम्प्युटरचे दुकानाला आज सकाळी आग लागून दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने अंदाजे ३० ते ४० लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज दिनांक ५ मे रोजी सकाळी दहा वाजताचे सुमारास तिरोडा वन विभाग कार्यालया समोर असलेले साई प्लाझा कॉम्प्लेक्स मधील स्काय कम्प्युटरचे दुकानाला आग लागल्याने ही माहिती त्वरित नगरपरिषद तिरोडा व अदानी प्रकल्पाचे अग्निशमन विभागाला देण्यात आली. तिरोडा नगर परिषदेचे अग्निशमन पथकाचे चालक चंद्रकुमार मलेवार, फायरमॅन प्रकाश फूडे ,अक्षय धांडे, अरबाज पठाण ,प्रवीण कांनतोडे अग्निशमन यंत्रासह तसेच अदानी प्रकल्पाची ही अग्निशमन यंत्र त्वरित घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला मात्र दुकानात कम्प्युटर व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असल्याने दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाला.

अग्निशमन विभागाचे प्रयत्नामुळे आजूबाजूचे कुठलेही दुकानाला क्षती पोहोचली नसली तरी स्काय कॅम्प्युटरचे अंदाजे ३० ते ४० लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीचे निश्चित कारण कळले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यावरून तिरोडा तहसीलदार नारायण ठाकरे यांनी तलाठी पवन चाफले यांचेसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.