
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : प्रखर उन्हाच्या झळा सोसणाºया तालुक्यातील गर्रा-बघेडा परिसराला आज निसर्गाच्या भीषण कोपाचा सामना करावा लागला. मंगळवारी दुपारी २:४५ वाजताच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि विजांच्या कडकडाटासह तुफानी गारपीट सुरू झाली. या अस्मानी संकटामुळे हाता तोंडाशी आलेला उन्हाळी पिकांचा घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दुपारच्या सुमारास अचानक काळोख दाटून आला आणि काही कळण्याच्या आतच गारांचा वर्षाव सुरू झाला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या थरारामुळे शेतात, घरांच्या छतावर आणि रस्त्यांवर गारांचा पांढरा खच साचला होता. या गारपिटीचा वेग इतका प्रचंड होता की, उन्हाळी पिकांचे देठ अक्षरश: कापले गेले आहेत.तालुक्यातील या भागात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाºया बागायती पिकांना या गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. आंबा, संत्री आणि लिंबाच्याबागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली असून झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या आहेत. कडाक्याच्या उन्हात पाणी देऊन जोपासलेली उन्हाळी पिके आता मातीमोल झाली आहेत. खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.