नौका उलटल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयाच्या वाघमंदिर परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या नऊ मित्रांपैकी दोन तरुणांचा नौकाविहारादरम्यान नाव उलटल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना बुधवारी १० जून दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुणाल शालिकराम भोंडे (वय २०) आणि मोहित वसंत रहांगडाले (वय २१, दोघेही रा. बरबसपुरा, ता. तिरोडा) अशी मृताची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बरबसपुरा येथील अक्षय नरेंद्र बिसेन, राकेश राधेश्याम लाडे, निखिल इंदल पटले, लक्की संजय रहांगडाले, प्रलय राधेश्याम पारधी, मनीष रमेश कोकूडे, अविनाशश्रावण टेकाम, मोहित रहांगडाले आणि कुणाल भोंडे असे नऊ मित्र बोदलकसा जलाशय पर्यटनस्थळी त्यापैकी एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. तेथे मासेमारीसाठी वापरण्यात येणारी एक नाव (डोंगा) दिसून आल्याने सर्वांनी नौकाविहार करण्याचा निर्णय घेतला.

सदर नाव पाण्यात उतरवून सर्व मित्र जलाशयात फिरत असताना अचानक नावावरील संतुलन बिघडून ती उलटली. या दुर्घटनेत कुणाल भोंडे आणि मोहित रहांगडाले हे दोघे पाण्यात बुडाले. घटनेनंतर इतर मित्रांनी आर- डाओरड केल्याने तेथील शेजारील लोकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत उर्वरित सात मित्रांना सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित वानखेडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली. दरम्यान, बातमी लिहीपर्यंत संबंधित विभागाकडून शोधमोहिम सुरू होती. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *