
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी जंगल शिवरात गेलेल्या युवकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज, शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील घुमर्रा बिट अंतर्गत येत असलेल्या कलपाथरी जंगल परिसरात उघडकीस आली. डूलेश्वर (छोटू) संतोष खरकाटे (३१) रा. कलपाथरी असे मृताचे नाव आहे. नवेगाव-नागझिरा बफर क्षेत्र घोषीत झाल्यानंतर गोरेगाव प्रादेशिक वन परिक्षेत्राचे विभाजन करण्यात आले असून काही भाग सडक अजुर्नी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया बफर क्षेत्रात तर काही भाग आमगाव वन विभागाच्या अख्त्यारीत येत आहे. दरम्यान, सदर घटना दोन्ही वनपरिक्षेत्राच्या मध्यभागी घडल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत टुलेश्वर हा दुपारच्या सुमारास शेळ्यांसाठी झाडाच्या फांद्या आणण्यासाठी दुचाकीने गावाला लागून असलेल्या जंगल शिवारात गेला होता. यावेळी दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला दुचाकीपासून सुमारे अर्धा किमी अंतरापर्यंत ओढत नेले, यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकºयांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती सडक अर्जुनी वन विभागाला देण्यात आली. दरम्यान, सडक अर्जुनीचे वन परिक्षेत्राधिकारी मिथून तरोणे व आमगावचे वनपरिक्षेत्राधिकारी आकरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून पाहणी केली आहे. याप्रकरणी सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी मिथून तरोणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर घटनेला दुजोरा देत ही घटना आमगाव वनपरिक्षेत्रात येत असल्याचे सांगितले.