
व्यापाऱ्याच्या घरावर छापा; अतिरिक्त साठा हस्तगत
₹9,00,000 किमतीचा मुद्देमाल जप्त
साकोली – स्थानिक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छत्तीसगड व मध्य प्रदेशातून सुगंधित तंबाखूची अवैध खेप मागवून साकोली शहरासह ग्रामीण भागात लाखांदूर, लाखनी व परिसरातील पान टपऱ्या व किरकोळ दुकानदारांना पुरवठा करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सुमारे 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनेक वर्षांपासून या व्यवसायात सक्रिय असलेला शहरातील मुख्य मोहरक्या व्यापारी पोलिसांच्या रडारवर होता आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही निर्णायक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून संपूर्ण पुरवठा साखळी उघडकीस आणली आहे.
दि. 09 जून रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या नेतृत्वात साकोली पोलीस पथकाने मौजा सेंदुरवाफा परिसरात सापळा रचला. यावेळी मारुती इको वाहन (MH35AR7965) अडवून आरोपी मोहित मदन कापसे (वय 30, रा. देवरी) याला सुगंधित तंबाखू व गुटखा वाहतूक करताना पकडण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता अंदाजे ₹3,50,000 किमतीचा साठा जप्त करण्यात आला. चौकशीत हा माल साकोलीतील व्यापारी तरुण राजकुमार मल्लानी (वय 40, रा. साकोली) याच्यासाठी आणण्यात येत असल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी तत्काळ मल्लानी यांच्या घरावर छापा टाकला असता तेथेही अंदाजे ₹5,000 किमतीचा सुगंधित तंबाखू व गुटखा साठा आढळून आला. अशा प्रकारे वाहन व घर मिळून सुमारे ₹9,00,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक भंडारा नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार व पथकाने सहभाग घेतला. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की अशा अवैध व्यवसायावर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असून संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त केले जाईल.