लॉज-कॅफे-मसाज पार्लरच्या आडून अनैतिक व्यवसायाचे जाळे सक्रिय?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील पर्यटनस्थळ परिसर, राष्ट्रीय महामार्गालगतचे कॅफे हाऊस, शहर व ग्रामीण भागातील लॉज तसेच काही मसाज पार्लर येथे अनैतिक व संशयास्पद प्रकार वाढल्याची गंभीर व धक्कादायक माहिती समोर येत आहे. काही लॉजमध्ये कुंटणखाने सुरू असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून तसेच स्थानिक पातळीवर चर्चतुन पुढे येत असून, या सर्व प्रकारामागे लॉज व मसाज पार्लर चालकांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषत: भरवस्तीतच अशा प्रकारांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॅफे हाऊसमध्ये अल्पवयीन मुलेमुली तसेच तरुणाईकडून अश्लील चाळ्यांचे प्रकार वाढत असल्याचे आरोप होत असून काही ठिकाणी युगुलांसाठी बंदिस्त कंपार्टमेंट, खासगी खोल्या तसेच एकांत व्यवस्था उपलब्ध करून दिल्याचेही उघड होत आहे.

या सुविधांचा गैरवापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, काही ठिकाणी लॉजमध्ये बेड सुविधा देऊन अनैतिक व्यवहारांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे कॅफे, लॉज आणि मसाज पार्लर हे ‘अनैतिक क्रियाकलापांचे केंद्र’ बनत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दरम्यान, या सर्व प्रकारांमध्ये केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराज्यीय पातळीवरील रॅकेट सक्रिय असल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे. काही वेळा अन्य राज्यांतील महिलांचा या प्रकरणांमध्ये समावेश असल्याची माहिती समोर येत असून, एजंटांच्या माध्यमातून त्यांची वाहतूक, निवास व्यवस्था आणि ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच शाळा व महाविद्यालय परिसरात वाढती लॉजची संख्या, पर्यटकांसाठी असलेल्या सुविधांचा गैरवापर आणि शहराच्या विविध भागांत उघडपणे सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींमुळे सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने ‘आॅलआऊट विशेष मोहीम’ राबवून कॅफे हाऊस, लॉज व मसाज पार्लरची सखोल तपासणी करावी तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाने कठोर व निर्णायक कारवाई करून संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करावे, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशाराही नागरिकांकडून दिला जात असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *