
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : बदलत्या हवामानाचा आणि संभाव्य अल निनो परिस्थितीचा भात शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी शेतकºयांनी पेरीव (डी.एस.आर.) भात लागवड पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, साकोली यांनी केले आहे. कमी पाण्यात, कमी खर्चात आणि कमी कालावधीत भात लागवड पूर्ण करणारी ही पद्धत शेतकºयांसाठी फायदेशीर ठरत असून उत्पादन खर्चात मोठी बचत करण्यास मदत करत आहे. भात शेतीत उत्पादन खर्च कमी करणे, वेळेवर लागवड करणे आणि हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाणे ही आजची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत पेरणी यंत्राद्वारे करण्यात येणारी पेरीव भात लागवड ही अत्यंत उपयुक्त आणि हवामान अनुकूल पद्धत मानली जात आहे. या पद्धतीत पारंपरिक चिखलणी आणि रोवणीची आवश्यकता नसल्याने मोठ्या प्रमाणावर श्रम, वेळ आणि खर्चाची बचत होते.
विशेष म्हणजे कमी पाण्यात भात लागवड शक्य होत असल्याने संभाव्य पावसाच्या खंडाचा परिणामही कमी होतो. कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात अनेक शेतकºयांकडे बहुपिक पेरणी यंत्र उपलब्ध आहेत. योग्य प्रकारच्या चकत्या किंवा आवश्यक तांत्रिक बदल करून या यंत्रांद्वारे भात पेरणी करता येते. पारंपरिक रोवणी पद्धतीच्या तुलनेत पेरीव भात लागवडीमुळे प्रतिएकर ८ ते १० हजार रुपयांपर्यंत खर्चात बचत होत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. ही पद्धत केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसून पर्यावरणपूरकही आहे. चिखलणी टळल्याने मिथेन वायूचे उत्सर्जन कमी होते. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव अधिक कार्यक्षम आणि सक्रिय राहतात. त्यामुळे चालू पिकाबरोबरच पुढील हंगामातील पिकांनाही सकारात्मक फायदा होतो. तसेच जमीन भुसभुशीत राहिल्याने रब्बी हंगामातील क्षेत्रवाढ- ीसही मदत मिळते. पेरीव भात लागवडीचे अनेक फायदे शेतकºयांसमोर आले आहेत.
रोवणीच्या तुलनेत उत्पादन खर्चात मोठी बचत, वेळेवर व कमी कालावधीत लागवड पूर्ण होणे, चिखलणी व रोवणी खर्चाची बचत, कमी बियाण्यात अधिक क्षेत्र लागवड, तणनियंत्रणासाठी निवडक तणनाशकांचा प्रभावी वापर, खतांचा नियंत्रित आणि कार्यक्षम वापर तसेच मजुरी खर्चात कपात हे त्यातील प्रमुख लाभ आहेत. सुधारित वाणांसाठी प्रतिएकर केवळ १८ ते २० किलो तर हायब्रीड वाणांसाठी सुमारे ९ किलो बियाण्याची आवश्यकता भासते. कृषी विभागामार्फत सध्या गावागावांत पेरणी यंत्राद्वारे भात लागवडीची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येत आहेत. या प्रात्यक्षिकांमधून शेतकºयांना डी.एस.आर. तंत्रज्ञानातील बारकावे समजावून सांगितले जात आहेत. आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकाºयांशी संपर्क साधून या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी व्हावे आणिस्थानिक परिस्थितीनुसार या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने २९ मे २०२६ रोजी जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यंदा मान्सून पर्जन्यमान सरासरीच्या सुमारे ९० टक्के राहण्याचा, तसेच त्यात चार टक्क्यांपर्यंत चढ-उतार होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांनी घाईघाईने पेरणी न करता किमान ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच भात पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. भात पेरणी प्रात्यक्षिक कार्यक्रमावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री. किशोर पात्रीकर तसेच तालुका कृषी विभाग, साकोली यांचा चमू उपस्थित होता.