
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (टखढ) वतीने पीसी स्नेहल कंस्ट्रक्शन कंपनीकडून सध्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. मात्र, या कंपनीच्या अत्यंत सुस्त आणि हलगर्जी कारभारामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रामनगर ते सूयार्टोला या महत्त्वाच्या मार्गावर मागील दोन महिन्यांपूर्वी रस्ता खोदून पाईपलाईन तर टाकण्यात आली, मात्र त्यानंतर हा रस्ता पूर्ववत न केल्याने हा मार्ग आता अपघाताचा सापळा बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात या मार्गावर खोदकाम करण्यात आले. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदार कंपनीने खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवला नाही आणि त्याचे सिमेंटीकरणही केले नाही. रस्ता तसाच खड्डेमय आणि अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आला आहे. वाहनधारकांच्या अपघातांत वाढ; मागील दोन-तीन दिवसांत अनेक जण जखमी हा मार्ग शहरातील गजबजलेल्या मार्गांपैकी एक असून, येथून दररोज हजारो नागरिक आणि वाहनधारकांची ये-जा असते. रस्ता खोदल्यामुळे आणि तिथे पसरलेल्या माती-धुळीमुळे वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषत: येत्या काही दिवसांत पावसाला शुरूवात होईल आणि खराब रस्त्यामुळे या मार्गावर अनेक दुचाकीस्वार घसरून पडले असून, काही नागरिकांना गंभीर दुखापतही झाली आहे. या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये कंत्राटदार कंपनी आणिमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरुद्ध तीव्र असंतोष पसरला आहे.