
अभिमन ठाकरे / भंडारा पत्रिका लाखांदूर : पवनी-लाखांदूर मार्गावरील सावरगाव येथील चुलबंद नदीच्या काठी वसलेले ‘चुलबंद शिवतीर्थ’ आता एका नूतन अध्यात्मिक ऊर्जेने उजळून निघणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश दयारामजी डोंगरे यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून साकारलेली भगवान हनुमानाची तब्बल १६५ फूट उंच भव्य मूर्ती भाविकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. सध्या या विलोभनीय मूर्तीची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात असून, महाशिवरात्रीला हे महाकाय स्वरूप भाविकांसाठी खुले होणार आहे. सुमारे अडीच दशकांपूर्वी रमेश डोंगरे यांनी चुलबंद नदीच्या निसर्गरम्य काठावर स्वखर्चातून भगवान शंकराचे भव्य मोठे मंदिर उभारले होते. या पवित्र स्थळाची ख्याती दूरवर पसरली असून, शंकराचार्यांसह अनेक मान्यवरांनी या स्थळाला भेट दिली आहे. याच परिसरात हनुमानजींची मूर्ती उभारण्याचा संकल्प डोंगरे कुटुंबीयांनी केला.
विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची देणगी न मागता, केवळ निस्सीम श्रद्धेपोटी स्वखर्चाने हा लोककल्याणकारी प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. या महाकाय मूर्तीचे बांधकाम ओडिशाहून आलेल्या शिल्पकार मोहन पल्लाई आणि त्यांच्या चमूने केले आहे. सुमारे तीन वर्षांच्या अविरत मेहनतीनंतर १६५ फूट उंचीची ही भव्य मूर्ती उभी राहिली आहे. सध्या मूर्तीला मनमोहक रंग देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला चुलबंद शिवतीर्थावर हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षी भाविकांना शिवदर्शनासोबतच १६५ फूट उंच हनुमानजींच्या भव्य रूपाचे दर्शन घेता येणार आहे. येणाºया महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर या मूर्तीचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती रमेश डोंगरे यांनी दिली. चुलबंद नदीच्या काठी असलेल्या या शिवतीर्थावर आता भक्तीचा आणि सौंदर्याचा एक अनोखा संगम पाहायला मिळणार असून, सावरगाव परिसराची ओळख एक प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून अधिक गडद झाली आहे.