
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच भावाची कुºहाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील परसटोला येथे बुधवारी १७ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी केशोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी भावाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मोहन मंगरू कवडो (४७) रा. परसटोला, ता. अर्जुनी-मोरगाव व आरोपी नारायण मंगरू कवडो (४४) हे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्या वडिलांनी दोघांनाही शेतीची वाटणी करून दिली होती.
मात्र वडिलांचा सांभाळ मृतक मोहन कवडो करीत असल्याने वडिलांच्या हिस्स्यातील शेती तोच करायचा. दरम्यान, घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास मोहन कवडो हे पत्नीसमवेत शेतात गेले असता आरोपी नारायण कवडो तेथे आला. वडिलांच्या हिस्स्यातील बांद्या मला द्याव्यात, या कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले असता आरोपीने संतापाच्या भरात कुºहाडीने मोहन कवडो यांच्या दोन्ही पायांवर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
रक्तस्त्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. मृतकाची पत्नी कविता मोहन कवडो (४०) यांनी केशोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून केशोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपी नारायण कवडो याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परसटोला परिसरात हळहळ व्यक्त होत असून किरकोळ जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा जीव गेल्याने गावात शोककळा पसरली आहे.