
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गडचिरोली : सागवान तस्करी प्रकरणात दाखल वनगुन्ह्यात परवाना रद्दचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास न पाठविण्याकरता तीन लाखांची लाच मागणी करुन दलालाकरवी ५० हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाºयासह वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १९ जून रोजी सकाळी जेरबंद केले. मुलचेरा तालुक्यातील पेड्डीगुडम येथे एकाचवेळी तिघे सापळ्यात अडकल्याने खळबळ उडाली.वनपरिक्षेत्राधिकारी श्रीनिवास मदनय्या कटकू ( वय ५२ ) ,वनरक्षक नीतेश पांडुरंग मडावी (वय ३७ ) व दलाल प्रदीप गणेश मंडल (वय ५०) यांचा आरोपींत समावेश आहे. तक्रारदार यांच्यावर ११ जून २०२६ रोजी अवैध सागवान लाकूड बाळगल्याप्रकरणी पेड्डीगुडम वनविभागांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा आधार घेत, तक्रारदार यांचे फर्निचर विक्रीचे लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे न पाठवण्यासाठीवनरक्षक नीतेश मडावी याने वनपरिक्षेत्राधिकारी श्रीनिवास कटकू यांच्या सांगण्यावरून १७ जून रोजी लाचेची मागणी केली. त्यानंतर १८ जून रोजी स्वत: वनपरिक्षेत्राधिकारी कटकू यांनी ३ लाख रुपयांची लाच मागून, त्याचा पहिला हप्ता म्हणून ५०,००० रुपये खासगी व्यक्ती प्रदीप मंडल याच्याकडे देण्यास सांगितले. सदर कारवाई उपअधीक्षक विक्रांत सगणे, पो.नि. किरण बगाटे, हवालदार किशोर जौंजारकर, राजेश पद्मगीरवार, स्वप्नील बांबोळे, राजेश्वर कुमरे, अंमलदार संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, संदीप उडाण, हितेश जेट्टीवार, नीतेश धुर्वे, विद्या म्हशाखेत्री यांनी कारवाई केली.