खुदखुडी मार्गावर तिरोडा पोलिसांची कार्रवाई
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
तिरोडा : रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तिरोडा पोलिसांनी कार्रवाई केली. ही कार्रवाई बुधवार, १६ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास सरांडी परिसरातील खुदखुडी मार्गावर करण्यात आली.
पोलीस निरीक्षक अमित वानखेडे हे पोलीस शिपाई राहुल पेशने, अमित गायकवाड व चालक अख्तर शेख यांच्यासह सरांडी परिसरात गस्तीवर होते. यावेळी खुदखुडी मार्गावर एक ट्रॅक्टर संशयास्पदरीतया येताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून त्याची पाहणी केली असता ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ बीसी ०३४० याच्या ट्रॉली क्रमांक एमएच ३५ ए.डब्लू. १५७५ मध्ये रेती भरलेली आढळून आली.
पोलिसांनी ट्रॅक्टर चालक विक्रम तेजराम बाभरे (रा. बिरोली) यांच्याकडे रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तिरोडा पोलीस ठाण्यात आणला.
या प्रकरणी संबंधित नियमानुसार पुढील कार्रवाई करण्यात येत असून, अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांकडून कार्रवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.