शासन निर्णयाची होळी करत तुमसर तहसीलवर धडक | स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे आंदोलन | दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
तुमसर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यात पावसाच्या मोठ्या खंडामुळे निर्माण झालेली गंभीर दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता, दोन्ही तालुके तात्काळ ‘दुष्काळग्रस्त’ घोषित करावेत या मागणीसाठी स्वराज्य युवा एकता फाउंडेशन, तुमसर च्या वतीने तुमसर तहसील कार्यालयासमोर शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध नोंदवत शासन निर्णयाची होळी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार उपेश अंबादे यांना दुष्काळ घोषित करण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
यावर्षी खरीप हंगामात ऐन मोक्याच्या काळात पावसाने मारलेली दांडी आणि पडलेल्या मोठ्या खंडामुळे भात (धान) पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, पिकांना ओलावा न मिळाल्याने शेतातील पिके करपून गेली असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. असे असतानाही शासनाकडून तुमसर व मोहाडी तालुक्याचा दुष्काळसदृश अथवा ट्रिगर-१ च्या यादीत समावेश न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच संतापाचा उद्रेक म्हणून स्वराज्य युवा एकता फाउंडेशनच्या नेतृत्वात शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत शासन निर्णय जाळून तीव्र निषेध व्यक्त केला.
या आंदोलनाचे नेतृत्व स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सलमान पठाण, हर्ष कठाने, उपसरपंच अशोक जगणाक, उमेश सहारे, रूपेश परतेती, बिनिश वाघमारे, बाळ्या सयाम, अमित देशभ्रतार, गुलाब वरखडे, तेजराम परतेती, लिखण गहाणे, शुभम रहांगडाले, अमोल देवघडे, ज्ञानेश्वर वासनिक, राजकुमार नेताम, प्रेमलाल गहाणे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“केवळ कागदोपत्री आकडेमोड न करता प्रशासनाने जमिनीवरील भीषण वास्तव पाहावे. तुमसर आणि मोहाडी तालुके तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना पूर्ण पीक विमा आणि आर्थिक मदत मिळालीच पाहिजे. जर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावनांची कदर केली नाही, तर आक्रमक लढा उभारला जाईल.”
– अमित मेश्राम, संस्थापक अध्यक्ष, स्वराज्य युवा एकता फाउंडेशन, तुमसर, जि. भंडारा.
तुमसर व मोहाडी तालुक्यातील दुष्काळाची भीषण वास्तवता लक्षात घेऊन तात्काळ दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना पीक विमा, आर्थिक मदत व महसुली सूट देण्यात यावी; अन्यथा येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनतर्फे प्रशासनाला देण्यात आला.
“शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त झाले असून खोडकिडा, मावा आणि तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे ज्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्याबाबत योग्य तो आवश्यक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तालुका कृषी विभागाकडे हे माहिती पाठवण्यात येत आहे.”
– उपेश अंबादे, तहसीलदार, तुमसर (जि. भंडारा)