दिघोरी-मोटीतील मुख्य हायवेच्या बाजूला जीवघेणी परिस्थिती
अपघाताची वाट पाहणाऱ्या खड्ड्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
दिघोरी-मोटी : दिघोरी-मोटी येथील मुख्य हायवे रस्त्यालगत निर्माण झालेला मोठा खड्डा वाहनचालकांच्या जीवावर उठत असून, अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या अगदी वळणावरच हा खड्डा खोदण्यात आल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना चुकविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः, रात्रीच्या अंधारात हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिघोरी-मोटी हा मार्ग साकोली, लाखांदूर आणि पालांदूर जाणाऱ्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, या मार्गावर दिवसभर लहान-मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेला हा खोल खड्डा सध्या वाहनचालकांसाठी गंभीर धोका बनला आहे. विशेष म्हणजे खड्डा खोदून ठेवण्यात आला, मात्र त्याठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक फलक, बॅरिकेडिंग अथवा प्रतिबंधक व्यवस्था करण्यात आलेली दिसत नाही.
दिवसा हा खड्डा काही प्रमाणात दिसत असला तरी रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर होते. अचानक समोर आलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा तोल जाणे, वाहन रस्त्याबाहेर जाणे किंवा समोरून येणाऱ्या वाहनाला धडक होणे, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. एखाद्याचा जीव गेल्यानंतर खड्डा बुजविण्याची प्रशासनाला प्रतीक्षा आहे का? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
जबाबदार कोण? प्रशासन की संबंधित ठेकेदार रस्त्यावर काम सुरू असेल तर वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी योग्य सूचना फलक, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि रात्री दिसेल अशी सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र, या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मते, रस्ता खोडण्यापूर्वी वाहतूक सुरक्षेचा विचार केला जातो की नाही? काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांच्या जीवाचा जबाबदार कोण घेणार, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. अपघात होण्यापूर्वी खड्डा बुजवा! संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून खड्डा सुरक्षित पद्धतीने बुजावा, परिसरात बॅरिकेडिंग करावे, रात्री रिफ्लेक्टर व चेतावणी फलक लावलेत आणि कामासाठी रस्ता खोडणाऱ्या संबंधित यंत्रणा/कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ‘अपघाताची नोंद झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच उपाययोजना करा,’ अशी संतप्त भावना वाहनचालक व नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाला थेट सवाल
खड्डा दिसत असूनही कारवाई का नाही?, सुरक्षा फलक-बॅरिकेड्स कुठे आहेत?, अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?, आणखी किती दिवस नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू राहणार? आता प्रशासनाने केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष कारवाई करून हा मृत्यूचा सापळा तातडीने दूर करण्याची गरज आहे.