
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्तीची रक्कम मिळवून देण्यासाठी कामगार मंडळाचे अधिकारी व स्वत:साठी १२ हजार रुपयाची मागणी करून ११ हजाराची लाच स्वीकारताना सेतू केंद्र चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी (ता. १०) ला घडली. या प्रकरणी सेतू केंद्र चालकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सतीश तुळशीराम मोटघरे असे सेतू केंद्र चालकाचे नाव असून त्याचे सिंधी लाईन परिसरात सेतू केंद्र आहे. तक्रारदार हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळचे नोंदणीकृत कामगार आहेत.
नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडून शिष्यवृत्ती मिळते. तक्रारदार यांनी सन २०२१ मध्ये सदरची शिष्यवृत्ती मिळणे करिता सतीश मोटघरे यांच्या सामान्य सेवा केंद्र (उरउ), लाखनी, भंडारा येथून आॅनलाईन अर्ज भरलेला होता. सदर वेळी सतीश मोटघरे याने तक्रारदार यांचे मुलांचे दहावी ची मार्कलिस्ट, डोमिसाईल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट, आधार कार्ड, कामगार कार्ड ही मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यानंतर वारंवार तक्रारदार यांनी त्यांची मूळ कागदपत्रे परत करण्यासाठी सतीश मोटघरे यांचे कडे पाठपुरावा केला. परंतु त्यांनी वारंवार काहीतरी कारण सांगून मूळ कागदपत्रे परत करण्यास टाळाटाळ केली. दिनांक ३० जानेवारी २६ रोजी तक्रारदार यांनी सतीश मोटघरे यांची सेतू सेवा केंद्र, लाखनी येथे भेट घेतली व त्यांचे मूळ कागदपत्रे त्यांना परत करण्याबाबत विनंती केली. यावर सतीश मोटघरे यांनी मूळ कागदपत्रे परत करण्यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालय, भंडारा येथील अधिकारी यांच्या करिता व स्वत: करिता १२ हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार दिनांक ३ फेब्रु.२०२६ रोजी प्राप्त झाली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ३ फेब्रु. २०२६ रोजी सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता नेहा सेतू केंद्र, सिंधी कॉलनी, लाखनी, भंडारा याचे संचालक सतीश तुळशीराम मोटघरे यांनी त्यांच्या ताब्यात असलेली तक्रारदार यांच्या मुलांची सर्व मूळ प्रमाणपत्रे तक्रारदार यांना परत करण्याचा मोबदला म्हणून तडजोड अंती ११ हजार रुपये लाच रक्क्म स्वत: स्वीकारण्याची सहमती दर्शविली असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आज मंगळवारी ( ता. १०) ला नेहा सेतू केंद्र, सिंधी लाईन चौक, लाखनी, भंडारा येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान सतीश तुळशीराम मोटघरे यांनी तक्रारदार यांचे कडून ११ हजाराची लाच रक्कम पंचासमक्ष स्वत: स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक वन प्लस नॉर्ड सी.इ ४ कंपनी चा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून घरझडती घेण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. याप्रकरणी लाखनी पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाही पोलीस उपधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, यांच्या मार्गदर्शनात पो. नि. नितेश देशमुख, पो. नि. उज्वला मडावी व त्यांची चमू यांनी केली आहे.