◆ तीन-चार वर्षांपासून मागणी दुर्लक्षित;
◆ २५ हजारांवर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
◆ सुविधांअभावी रुग्णांची ससेोलपट; आंदोलनाचा इशारा
◆ राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळणार कधी?
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
दिघोरी (मोठी) : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी (मोठी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गेल्या तीन-चार वर्षांपासून डायल १०८ रुग्णवाहिकेची प्रतीक्षा आहे. साकोली-चंद्रपूर व गडचिरोली मार्गावरील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या आरोग्य केंद्रावर परिसरातील २५ ते ३० गावांतील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असताना, अद्याप रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने आपत्कालीन रुग्णांचे हाल होत आहेत. वारंवार निवेदन देऊनही मागणीची दखल घेतली जात नसल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिघोरी (मोठी) हे गाव साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तीन तालुक्यांच्या सीमेलगत असल्याने परिसरातील नागरिकांसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाचे आहे. मात्र, आरोग्य केंद्राची जीर्ण इमारत, ऑपरेशन थिएटरचा अभाव आणि कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टरांची अनुपलब्धता यांसारख्या समस्यांमुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी साकोली किंवा भंडारा येथे पाठवावे लागते. अशा परिस्थितीत आपत्कालीन रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास उपचारासाठी विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रीय महामार्गावर वारंवार लहान-मोठे अपघात घडत असल्याने या भागात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिकेची नितांत गरज आहे. सध्या रुग्णांना पुढील उपचारासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत वेळेचेही मोठे आव्हान निर्माण होते.
या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संबंधित विभागाकडे गेल्या तीन-चार वर्षांत अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र, अद्याप मागणीची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे दिघोरी (मोठी) व परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आरोग्य विभाग आता तरी जागा होणार का?
परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने तातडीने दिघोरी (मोठी) प्राथमिक आरोग्य केंद्राला डायल १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा ग्रामपंचायत प्रशासनाच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.