“लोकप्रतिनिधीलाच न्याय नाही, तर सर्वसामान्यांचे काय?”

साकोली ठाणेदाराविरोधात आमदार विनोद अग्रवाल यांची पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार
कारवाईची मागणी; वरिष्ठ अधिकारी मौन ?
अवैध धंद्यांवर नियंत्रण नसल्याने प्रशासनावरही प्रश्नचिन्ह

साकोली : साकोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महादेव आचरेकर यांनी रस्ते अपघात प्रकरणाच्या तपासादरम्यान अन्यायकारक, असभ्य व उपेक्षापूर्ण वागणूक दिल्याचा गंभीर आरोप करत आमदार विनोद अग्रवाल यांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेनंतर “जेव्हा लोकप्रतिनिधीलाच पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक मिळत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय आणि आदर कसा मिळत असेल?” असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
आमदार अग्रवाल यांची ही तक्रार अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कथित गांजा विक्री, मटका, ऑनलाइन सट्टा, अवैध दारू विक्री, रेती तस्करी, गोवंश तस्करी तसेच काही हॉटेल व लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक प्रकारांबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. या अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यात प्रशासन अपेक्षित गांभीर्य दाखवत नसल्याचा आरोप सामाजिक संघटना व नागरिकांकडून केला जात आहे.
तक्रारीनुसार, २९ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास भंडारा-साकोली-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या नातेवाईकांच्या मालकीच्या एमएच-३५-बीसी-९९११ क्रमांकाच्या फॉर्च्युनर वाहनाची एका पादचाऱ्यासोबत दुर्घटना झाली. अपघातानंतर घटनास्थळावरून न जाता आपण स्वतः साकोली येथील शासकीय रुग्णालयातून रुग्णवाहिका आणून जखमी व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले तसेच त्याच्या उपचाराची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या, असे आमदार अग्रवाल यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
यानंतर ते स्वतः साकोली पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यावेळी माजी आमदार राजेश (बाला) काशीवार तसेच भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे उपस्थित असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून पोलिसांनी त्यांना जाण्यास सांगितले.
आमदार अग्रवाल यांनी आरोप केला आहे की, दुसऱ्या दिवशी विमा दाव्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे व अहवालाची प्रत मागितल्यानंतर त्यांच्या वाहनचालकाला अनेक तास पोलीस ठाण्यात थांबवून ठेवण्यात आले. तसेच वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ठाणेदारांकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. अखेर अहवालाची प्रत मिळाल्यानंतर त्यामध्ये अपघातानंतर वाहन घटनास्थळावरून पळून गेल्याचा उल्लेख असल्याचे पाहून त्यांना धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जखमी व्यक्तीला स्वतः रुग्णालयात दाखल करून उपचाराची व्यवस्था करणाऱ्या व्यक्तीबाबत अशा प्रकारची नोंद करणे हे वस्तुस्थितीच्या विरोधात असून लोकप्रतिनिधीचा अपमान असल्याचे आमदार अग्रवाल यांनी म्हटले आहे. तपास प्रक्रियेदरम्यानच उपेक्षा, विलंब आणि संवादाचा अभाव जाणवत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींवर नेमकी कशी कार्यवाही होत असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, साकोली पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीबाबतही नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. परिसरात कथितरीत्या सुरू असलेल्या गांजा विक्री, मटका, ऑनलाइन सट्टा, अवैध दारू विक्री, रेती तस्करी आणि गोवंश तस्करीसारख्या प्रकारांवर प्रभावी नियंत्रण का मिळवता आले नाही, याबाबत सामाजिक संघटनांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही अवैध धंद्यांना राजकीय संरक्षण मिळत असल्याच्याही चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू असल्या तरी त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
याच पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, या सर्व आरोपांची अद्याप स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नसून कोणत्याही चौकशी यंत्रणेने याबाबत अधिकृत निष्कर्ष जाहीर केलेले नाहीत.
आपल्या तक्रारीत आमदार विनोद अग्रवाल यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून साकोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महादेव आचरेकर यांच्या कथित भूमिकेची जबाबदारी निश्चित करावी तसेच आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्याविरुद्ध विभागीय व शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
या तक्रारीमुळे केवळ अपघात प्रकरणच नव्हे, तर साकोली परिसरातील कायदा व सुव्यवस्था, पोलीस प्रशासनाची कार्यशैली आणि अवैध धंद्यांवरील नियंत्रण यांसारखे प्रश्नही पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. आता या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणती भूमिका घेतात, चौकशीत कोणते तथ्य समोर येतात आणि आमदार अग्रवाल यांच्या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *