पिंडकेपारच्या पडीक/बंजर जमिनीवर फुलणार फळांची अमराई!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण रोजगारनिर्मितीचा समन्वय साधत गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार ग्रामपंचायतीने गावातील पडीक/बंजर जमिनीवर फळझाडांची अमराई विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘व्हीबी-जी रामजी’ योजनेंतर्गत सुमारे दोन हजार फळझाडांची लागवड करण्यात येणार असून, गुरुवार, २९ आॅक्टोबर रोजी वृक्षारोपणाने या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या माध्यमातून बंजर जमिनीला हरित स्वरूप प्राप्त होण्यासोबतच स्थानिक मजुरांना तीन वर्षांपर्यंत रोजगार उपलब्ध होणार आहे. गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी पडीक जमिनीचा उपयोग करण्याचे नियोजन केले आहे.

या जमिनीवर विविध प्रजातींच्या फळझाडांची लागवड करून अमराई विकसित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाºया या उपक्रमांतर्गत गावातील पडीक जमिनीसह रस्त्याच्या दुतर्फाही वृक्षलागवड केली जाणार आहे. त्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत लागवड करण्यात येणाºया झाडांचे पुढील तीन वर्षे संगोपन व संवर्धन केले जाणार आहे. त्यामुळे गावातील सुमारे २० ते २५ स्थानिक मजुरांना स्थायी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. बंजर जमिनीचे उत्पादक क्षेत्रात रूपांतर करण्यासोबतच ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, गुरुवारी या उपक्रमाचा सरपंच योगिता सहारे, उपसरपंच भरत घासले, ग्रामपंचायत सदस्य नीलकंठ बिसेन, चंद्रकिशोर पटले, सुनील सोनवाने, मंगला पटले, रेखा रहांगडाले, रूपा लटये, कला चौधरी, कांचना सहारे, राजकुमार साखरे, रविंद्र साखरे, प्रशांत साखरे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *