भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी : गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दुरवस्थेबाबत ‘भंडारा पत्रिका’ मध्ये बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाला जाग आल्याचे चित्र दिसून येत आहे. दवाखाना परिसरात स्वच्छतेला सुरुवात झाली असून डॉक्टरही उपस्थित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नांचा परिणाम दिसू लागला असला, तरी ही सुधारणा कायम टिकणार की पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होणार, हा खरा प्रश्न आहे. शेतकºयांच्या पशुधनाच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या दिघोरी मोठी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत धूळ खात पडली होती. परिसरात झाडाझुडपांचे साम्राज्य, अस्वच्छता आणि डॉक्टरांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित होत होते. शासकीय निधीतून उभारलेल्या इमारतीचा पशुपालकांना नियमित लाभ मिळत नसेल, तर या व्यवस्थेचा उपयोग नेमका कोणासाठी,असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रतिनिधींनी तालुका पशुसंवर्धन अधिकारी तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर बातमी प्रसिद्ध झाली आणि आता दवाखाना परिसरातील स्वच्छतेला सुरुवात झाल्याचे, तसेच डॉक्टर उपस्थित असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे बातमीचा परिणाम प्रशासनाच्या हालचालीतून दिसत असला, तरी यापूर्वी ही व्यवस्था नियमित कानव्हती, याचे उत्तर मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एक दिवस स्वच्छता करणे किंवा बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर डॉक्टरांची उपस्थिती दिसणे पुरेसे नाही. पशुवैद्यकीय दवाखाना नियमित सुरू राहणे, डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपलब्ध असणे, औषधांचा पुरवठा होणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही संबंधित यंत्रणेची नियमित जबाबदारी आहे. जनावर आजारी पडल्यावर पशुपालकांना उपचारांसाठी दुसरीकडे धाव घ्यावी लागत असेल, तर शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणारच. तालुका व जिल्हा पशुसंवर्धन विभागाने या दवाखान्याची प्रत्यक्ष पाहणी करून डॉक्टरांच्या उपस्थितीची नोंद, नियमित सेवा, औषधसाठा आणि स्वच्छतेची व्यवस्था तपासणे आवश्यक आहे. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर झालेली हालचाल स्वागतार्ह असली, तरी ती केवळ काही दिवसांपुरती मर्यादित राहू नये.