
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : महाशिवरात्रीचे पावन औचित्य साधून बारव्हा येथील हनुमान देवस्थान परिसरात लोकसहभागातून नवनिर्मित शिवलिंग व नंदीची प्राणप्रतिष्ठा तसेच लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सोहळ्याचे लोकार्पण आ. नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक विधींनी झाली. तुमसर येथील प्रसिद्ध ‘रामायण ग्रुप’ यांच्या वतीने सुमधुर स्वरात स्वरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सुंदरकांड आणि हनुमान चालीसा पठणाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. उपस्थित भाविकांनी या सुश्राव्य भजनांचा आनंद घेतला.
या मंगल प्रसंगी आ. पटोले यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यात काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रदीपभाऊ बुराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालू चून्ने, सुहास शेंडे, काँग्रेस सचिव उत्तम भागाडकर, जैतपूर येथील सरपंच रोहिणी कोरे डॉ. हरिभाऊ बुद्धे, शाम बुद्धे, दिलीप चुन्ने, बाबुराव बुद्धे , दिलीप सलामे, अनिल कापगते, पत्रकार निशाद लांजेवार . विलास मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना आ. नाना पटोले यांनी सरकारच्या धोरणांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की, “सरकार शेतकºयांच्या धानाचे पैसे वेळेवर देऊ शकत नसल्याने आज शेतकरी, व्यावसायिक आणि सामान्य ग्रामस्थ आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, अशा मंगल प्रसंगी साधी वर्गणी देण्याची हिंमतही लोकांमध्ये उरलेली नाही. सरकारने जनतेची मोठी फजिती केली आहे.”कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिर समितीचे अध्यक्ष मोहन चुन्ने यांनी केले. संचालन चंद्रहास चव्हाण यांनी तर उपस्थितांचे आभार मंदिराचे उपाध्यक्ष अनिल झोडे यांनी मानले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी दूधराम, डुलेस शिवरकर, प्रकाश शिवरकर, राजू शिवरकर, उदेभान शिवरकर, पुंडलिक लाडे, गुलाब नागपुरे तसेच बारव्हा येथील गणेश मंडळ आणि महिला दुर्गा उत्सव मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.