मुरमाडी-बारव्हा रस्त्यावर दोन वर्षांपासून मलमपट्टीच! खड्डे मात्र ‘जैसे थे’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी ते बारव्हा या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मार्गावर खड्डे बुजविणे आणि डागडुजीच्या नावाखाली कामे केली जात असल्याचे चित्र आहे. मात्र, वारंवार दुरुस्ती करूनही रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने या कामांचा नेमका उपयोग काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

दोन वर्षांपासून दुरुस्ती, तरी खड्डयांचा प्रश्न कायम

या रस्त्यावर खड्डे पडले की त्यावर तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र, काही दिवस उलटताच पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती केली जात आहे की केवळ शासकीय निधी खर्च करण्यापुरती मलमपट्टी केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रस्त्याची मूळ समस्या कायम असताना वारंवार करण्यात येणाºया तात्पुरत्या दुरुस्तीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनचालकांचा जीव धोक्यात. या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र, रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेष म्हणजे,

दोन वर्षांपासून दुरुस्ती सुरू असल्याचे सांगितले जात असताना नागरिकांना मात्र सुरक्षित आणि सुस्थितीतील रस्ता मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. दुरुस्तीच्या खर्चाची आणि कामाच्या दर्जाची चौकशी होणार का. वारंवार खड्डे बुजविण्याची कामे होत असतील, तर त्यासाठी किती निधी खर्च झाला? संबंधित कामे कोणत्या ठेकेदारामार्फत करण्यात आली? कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणी केली का? तसेच दुरुस्ती केल्यानंतर काम टिकत नसल्यास संबंधित ठेकेदारावर जबाबदारी निश्चित करण्यात आली का. असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *