कारधा येथे दुचाकीवर माकड उडी मारल्याने महिला गंभीर जखमी होऊन मृत; भंडारात तरुणीचा मृत्यू, लाखांदुरात कर्जाच्या तणावातून शेतकऱ्याची आत्महत्या
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : जिल्ह्यातील कारधा, भंडारा आणि लाखांदूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. कारधा येथे दुचाकीवर माकड उडी मारल्याने खाली पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भंडारा येथे २३ वर्षीय तरुणीची प्रकृती अचानक बिघडल्याने मृत्यू झाला, तर लाखांदूर तालुक्यातील टेंभरी येथे कर्जाच्या परतफेडीच्या तणावातून विषारी औषध प्राशन केलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तिन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुचाकीवर माकड उडी मारल्याने महिलेचा मृत्यू
कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करचखेड़ा ते खमारी मार्गावर हा अपघात घडला. सरस्वता कंंगाले (५९, रा. जंगल गराडा) या दुचाकीने गावी परत जात असताना अचानक एका माकडाने दुचाकीवर उडी मारली. त्यामुळे दुचाकीवर मागे बसलेल्या सरस्वता कंंगाले या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आनंदराव सखाराम कंंगाले (६८) यांच्या तोंडी तक्रारीवरून कारधा पोलिसांनी मर्ग क्र. ५४/२०२६ नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संदीप केंद्रे करीत आहेत.
२३ वर्षीय तरुणीचा अचानक मृत्यू
भंडारा शहरातील मोहदुरा येथील दिव्या राजेंद्र कांबळे (२३) हिची प्रकृती अचानक बिघडल्याने मृत्यू झाला. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ती घरी असताना तिला उलट्या होऊ लागल्या. तिच्या लहान बहिणीने वडील राजेंद्र कांबळे यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी तिला तातडीने डॉ. वाणे रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वडील राजेंद्र प्रल्हाद कांबळे (५५) यांच्या तोंडी तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी मर्ग क्र. ५०/२०२६ नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
कर्जाच्या तणावातून विषारी औषध प्राशन; उपचारादरम्यान मृत्यू
लाखांदूर तालुक्यातील टेंभरी येथील प्रभू विठोबा कांबळे (५५) यांनी महिंद्रा फायनान्सकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाच्या काही हफ्त्यांची परतफेड केल्यानंतरही उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी वारंवार फोन येत असल्याने ते तणावात होते. याच तणावातून त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती पोलिसांच्या नोंदीत आहे. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना प्रथम लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला भंडारा शहर पोलिस ठाण्यात झिरो मर्ग नोंदविण्यात आला होता. घटनास्थळ लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने लाखांदूर पोलिसांनी मर्ग क्र. ५२/२०२६ नोंदविला आहे. पुढील तपास सहायक फौजदार तलवले करीत आहेत.
या तिन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित पोलीस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू आहे.
