मालकाच्या निधनानंतर दोन दिवस अन्न-पाण्याविना राहिली ‘जुली’!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं हे केवळ प्रेमाचं नसून विश्वास, आपुलकी आणि निस्सीम निष्ठेचं असतं, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय गोंदिया तालुक्यातील उमरी येथे आला. आपल्या लाडक्या मालकाच्या निधनानंतर दोन दिवस अन्न-पाण्याला स्पर्श न करणाºया ‘जुली’ या श्वानाने अखेरच्या क्षणापर्यंत मालकाची साथ सोडली नाही.

अंत्ययात्रेतही स्मशानभूमीपर्यंत सोबत गेलेल्या या मुक्या जीवाचे प्रेम पाहून उपस्थित कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांचे डोळे पाणावले. उमरी येथील बागडे परिवारातील रंजीत बागडे यांचे अचानक प्रकृती बिघडल्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, या दु:खात सर्वाधिक अस्वस्थ झाली ती मागील चार वर्षांपासून रंजीत बागडे यांच्यासोबत राहणारी त्यांची लाडकी ‘जुली’.

चार वर्षांच्या सहवासात रंजीत बागडे आणि जुली यांच्यात एक अतूट नातं निर्माण झालं होतं. मालकाचे प्रेम, माया आणि सहवास हीच जुलीसाठी जणू संपूर्ण दुनिया होती. रंजीत बागडे यांच्या निधनानंतर जुली त्यांच्या पार्थिवाजवळून हलायलाही तयार नव्हती. विशेष म्हणजे, मालकाच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याप्रमाणे तिने सलग दोन दिवस अन्न-पाणीदेखील घेतले नाही. कुटुंबीयांनी तिला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र ती आपल्या मालकाच्या आठवणीतच पार्थिवाजवळ बसून राहिली. एवढेच नव्हे तर रंजीत बागडे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यानंतर जुलीही त्यांच्या मागोमाग स्मशानभूमीपर्यंत पोहोचली.

अंत्यसंस्कारासाठी पार्थिव खाली ठेवण्यात येताच ती पुन्हा मालकाजवळ जाऊन बसली. जणू काही आपल्या लाडक्या मालकाला अखेरचा निरोप देत असल्याचे हे दृश्य होते. हा प्रसंग पाहून उपस्थित प्रत्येक जण भावुक झाला. माणसांमध्येही क्वचितच पाहायला मिळणारी अशी निष्ठा एका मुक्या प्राण्याने आपल्या कृतीतून दाखवून दिली. माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेमाला शब्दांची गरज नसते, तर ते भावनांमधून व्यक्त होत असते, याची जाणीव या घटनेने करून दिली. सध्या जुलीच्या या निस्सीम प्रेमाची आणि आपल्या मालकाप्रती असलेल्या निष्ठेची चर्चा उमरी गावासह परिसरात होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *