भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गर्रा-बघेडा : तुमसर तालुक्यातील सितासावंगी गावची गुणवंत कन्या श्रुती डहरवाल हिने भारतीय वायुसेनेत फ्लाइंग आॅफिसर बनण्याचा बहुमान मिळवून आपल्या गावाचे, कुटुंबाचे आणि संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेल्या समर्पणाच्या जोरावर तिने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे डहरवाल कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रुती डहरवाल या डॉ. नागेंद्र डहरवाल आणि मंगला डहरवाल यांच्या कन्या असून त्यांचा जन्म सितासावंगी येथे झाला. त्यांचे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तुमसर येथील एस.एन.एस. स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी बारावीचे शिक्षण नागपूर येथील नटवरलाल स्कूलमधून पूर्ण केले. पुढे नागपूर येथील रामदेवबाबा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करणाºया श्रुती यांनी भारतीय वायुसेनेच्या प्रवेश परीक्षेत उत्कृष्ट गुणवत्ता क्रमांक मिळवत वायुसेनेत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न साकार केले. त्यानंतर हैदराबाद येथील दुंडीगलस्थित वायुसेना अकादमीमध्ये त्यांनी कठीण सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. तसेच बंगळुरू येथील एअर फोर्स टेक्निकल कॉलेज (एएफटीसी) येथे तांत्रिक प्रशिक्षणही यशस्वीपणे पूर्ण केले.
नुकत्याच पार पडलेल्या दीक्षांत संचलनासह त्यांच्या प्रशिक्षणाची सांगता झाली असून त्यांची भारतीय वायुसेनेत फ्लाइंग आॅफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे, शिक्षणासोबतच श्रुती यांना क्रीडा क्षेत्राचीही विशेष आवड आहे. त्यांनी विद्यापीठस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपल्या खेळातील कौशल्याचीही छाप पाडली आहे. शिक्षण, क्रीडा आणि सैनिकी प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांतील त्यांचा प्रवास मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
श्रुती यांचे वडील डॉ. नागेंद्र डहरवाल हे सितासावंगी येथील विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राचार्य पदावर कार्यरत राहिले आहेत, तर आई मंगला डहरवाल या गृहिणी आहेत. सध्या डहरवाल कुटुंब नागपूर येथे वास्तव्यास आहे. श्रुती डहरवाल यांच्या या उल्लेखनीय यशामुळे डहरवाल कुटुंबाचा गौरव वाढला असून ग्रामीण भागातील मुलींसाठी त्या प्रेरणादायी ठरल्या आहेत. योग्य ध्येय, कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले आहे. सितासावंगीच्या या लेकीने मिळविलेल्या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
