भंडारा जिल्ह्यात १५ डिसेंबरपर्यंत शेतीसाठी बोअरवेल खोदकामास परवानगी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शेतीची कामे आणि सिंचनाची गरज लक्षात घेता भंडारा जिल्ह्यात शेतीसाठी नवीन बोअरवेल खोदण्यास १५ डिसेंबर २०२६ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. यासाठी यापूर्वी लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले असून, शेतीविषयक बोअरवेल खोदकामासाठी विशेष परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सावन कुमार यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भूजल स्रोतांचे संरक्षण आणि सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी १४ आॅक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार नवीन बोअरवेल खोदकामावर निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, सध्याची शेतीची गरज आणि पिकांच्या सिंचनाचा प्रश्न विचारात घेऊन प्रशासनाने शेतीसाठी मर्यादित कालावधीकरिता ही सवलत दिली आहे.

ही परवानगी केवळ शेतीविषयक कामांसाठी लागू राहणार असून, इतर प्रयोजनांसाठी बोअरवेल खोदण्यावरील पूर्वीचे निर्बंध कायम राहतील. तसेच महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. ५०० मीटर परिसरात बोअरवेल खोदण्यास मनाई सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहीर किंवा विंधन विहिरीपासून ५०० मीटरच्या अंतरात कोणत्याही प्रयोजनासाठी खाजगी विहीर अथवा बोअरवेल खोदता येणार नाही. तसेच नळ पाणीपुरवठा उद्भवाच्या ५०० मीटर परिसरातील खाजगी विहिरीत इनवेल किंवा आडवे बोअर घेण्यास मनाई राहील.

कोणत्याही परिस्थितीत ६० मीटरपेक्षा अधिक खोलीची विंधन विहीर किंवा कुपनलिका खोदता येणार नाही. या अटींचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भूजल कायद्यासह इतर लागू वैधानिक तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू झाला असून १५ डिसेंबर २०२६ पर्यंतच ही सवलत राहणार आहे. त्यानंतर बोअरवेल खोदकामावरील पूवीर्चे निर्बंध पुन्हा लागू होतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *