♦ सहावी-सातवीतील विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याचा गंभीर आरोप
♦ शिक्षकाला तात्काळ निलंबित करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांचा इशारा
♦ सावरी जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार; संतप्त ग्रामस्थांचा शाळेत आक्रोश, शिक्षक पोलिसांच्या ताब्यात
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देऊन त्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकानेच विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया तालुक्यातील सावरी येथील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला आहे. सहावी आणि सातवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत शिक्षकाने अश्लील चाळे केल्याचा तसेच त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत संबंधित शिक्षकाला जाब विचारला. परिस्थिती इतकी चिघळली की, ग्रामस्थांनी शिक्षकाला चोप देण्याची भूमिका घेतली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत शिक्षकाला ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपी शिक्षकाचे नाव नागोराय कटरे असून त्याचे वय ५५ वर्षे असल्याची माहिती आहे.
सावरी येथील जिल्हा परिषद शाळेत सहावी आणि सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत संबंधित शिक्षक अश्लील चाळे करीत असल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनींना शरीराच्या वेगवेगळ्या भागांना अयोग्य पद्धतीने स्पर्श करून त्रास दिला जात असल्याचे मुलींनी आपल्या पालकांना सांगितले. आपल्या पाल्यांसोबत शाळेत असा प्रकार घडत असल्याचे समजताच पालकांना मोठा धक्का बसला. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर संतप्त पालकांनी थेट शाळा गाठली आणि संबंधित शिक्षकाला जाब विचारत धारेवर धरले. ही बातमी गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ शाळेच्या परिसरात जमा झाले. ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. काही ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकाला चोप देण्याची तयारी दर्शविल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांच्या तावडीतून शिक्षकाला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला रावणवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. केवळ पोलिसांत गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर अशा गंभीर आरोपांना सामोरे जाणाऱ्या शिक्षकाला शिक्षण विभागाने तात्काळ निलंबित करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असताना संबंधित शिक्षकाला शाळेत राहू देणे योग्य नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. शिक्षकाला तातडीने निलंबित न केल्यास गावकरी एकजुटीने मोठे आंदोलन छेडतील, असा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. शाळा ही विद्यार्थ्यांसाठी ज्ञानमंदिर आणि सुरक्षिततेचे ठिकाण असते. मात्र, त्याच ठिकाणी विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत गंभीर आरोप समोर येणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यासोबतच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
