३९ जनावरांची सुटका,२ ट्रक जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मध्यप्रदेशातून आणलेल्या म्हशींची भंडारामार्गे नागपूर येथील कत्तलखान्याकडे वाहनांमध्ये कोंबून रवानगी केली जात असताना भंडारा पोलिसांनी कारवाई केली. यावेळी ३९ म्हशींची सुटका करून दोन ट्रक जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई मंगळवारी राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाकडून करण्यात आली. नागपूर येथील कत्तलखान्याकरिता मध्यप्रदेशातून जनावरांची खरेदी करून भंडारामार्गे त्यांची वाहतूक केली जाते. वारंवार असे प्रकार उघडकीस येऊनही यावर ठोस कारवाई करण्यात येत नाही. दरम्यान मंगळवारी दोन वाहनांमध्ये जवळपास ४० म्हशी कोंबून यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक लोहित मतानी त्यांच्या विशेष पथकाला कारवाईचे निर्देश दिले. या पथकाने भंडारा स्टेशनच्या हद्दीतून जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी ट्रक क्रमांक सीजी ०७/बीक्यू १४८३ व एमपी ०९/जीएच ४८३५ यामध्ये ३९ म्हशी अत्यंत दाटीवाटीने कोंबून असलेल्या दिसून आल्या. त्यांच्या चालकांना म्हशींबाबत विचारणा केली असता खरेदीचा तसेच वाहतुकीचा कोणताही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे ट्रकमध्ये निर्दयीपणे कोंबलेल्या म्हशी कत्तलखान्याकडे जात असल्याचे स्पष्ट झाल्याने दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन ट्रक जप्त करून म्हशींची सुटका करण्यात आली. म्हशीं व ट्रकसह जवळपास ९ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *