जिल्ह्यात दमदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुराने आठ मार्ग बंद झाले आहे. भंडारा शहरातील अनेक घरात पाणी शिरले असून गोसे प्रकल्पाचे २५ दरवाजे उघडण्यात आले आहे. ग्रामीण भागात काही घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. सोमवारी पहाटे ४.३० वाजतापासून जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत सारखा पाऊस कोसळत होता. पवनी तालुक्यातील सोमनाळा-कोंढा मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानेहा मार्ग सकाळपासून बंद आहे. या सोबतच विरली ते सोनेगाव, अड्याळ ते सोनगाव, अड्याळ ते दिघोरी, लाखांदूर ते पिंपळगाव, पाऊलदौना ते बेलची, पाऊलदौना ते तई, लाखांदूर ते अर्जुनी मोरगाव हे मार्ग बंद आहेत. जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ, कोंढा, चिचाळ, आसगाव, साकोली तालुक्यातील एकोडी, लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर, बारव्हा, मासळ आणि लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. लाखनी तालुक्यातील लावडी येथील तेजराम गभने यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. भंडारा शरातील म्हाडा कॉलनी, भोजापूर परिसरातील अनेक घरांत पाणी शिरले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *