मांडोदेवीचे दर्शन करून परत येत असताना अपघात…अपघातात पाच युवक जखमी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : मांडोदेवी येथील देवीचे दर्शन करून परत येत असताना टाटाएस (मालवाहक) वाहन विद्युत खांबाला आदळले. या अपघातात पाच युवक जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. ४) पहाटे साडेतीनच्या सुमारास येथील पॉलिटेक्नीक कॉलेजजवळ घडली. जखमींवर येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या नवरात्रोत्सव सुरू असून, देवी दर्शनाला भाविक मोठ्या प्रमाणात जात आहेत. सोमवारी (ता. ३) रात्री १० च्या सुमारास गोविंदपूर परिसरातील १० ते १२ युवक गोंदिया येथून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडोदेवी येथील देवीदर्शनासाठी टाटाएस (मालवाहक) क्रमांक एम एच ३५ एजे ०५३७ वाहनाने गेले होते. देवी दर्शन करून गोंदियाकडे परत येत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास पॉलिटेक्नीक कॉलेजसमोरील दुभाजक असलेल्या विद्युत खांबाला वाहन आदळले. या अपघातात पवन उके (वय २४), यश तिवारी (वय २७), अक्षय लाडे (वय १७), सौरभ यादव (वय १९), गौरव उके (वय २०) हे जखमी झाले. जखमींवर येथील गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. वाहनाची धडक इतकी जोरदार होती की, विद्युत खांब तुटून पडला. या घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.