सावरला जंगल परिसरात एकाचवेळी ४ वाघांचे दर्शन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : जिल्ह्यात एका नरभक्षक वाघाला जेरबंद केले असताना, आता चार वाघांचे दर्शन झाले. पवनी तालुक्यातील सावरला जंगल परिसरात मंगळवारी एकाचवेळी या चार वयस्क वाघांचे दर्शन गुराख्याला झाल्याने खळबळ माजली आहे. पवनी तालुक्यातील सावरला परिसर जंगलव्याप्त असून या गावालगतच्या जंगलाला ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत. सावरला येथील गुराख्याने मंगळवारी या जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी नेले होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गुरे चारत असताना वनपरिक्षेत्रातील तलाव क्रमांक दोनच्या जवळ एकाच वेळी ४ वयस्कर वाघांचे दर्शन झाले. एकाच वेळी तब्बल चार मोठे वाघ दिसून आल्याने सदर गुराख्याची भांबेरी उडाली. मात्र त्याचवेळी त्यांनी लपून या वाघांचा चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केले. यानंतर तातडीने तिथून निघून जात ही माहिती ग्रामस्थांना दिली. या परिसरातील लोकांना नेहमीच कामानिमित्त पवनी- ब्रह्मपुरी रस्त्याने ये-जा करावी लागते. आधीच जिल्ह्यात नरभक्षक वाघाची दहशत पसरली असताना एकाचवेळी तब्बल चार वाघ दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये खडबड माजली. वन कर्मचायांना याविषयी माहिती होताच नागरिकांनी जंगलात जाऊ नये तसेच सायंकाळी ५ वाजता नंतर सावरला ते पवनी व सावरला ते ब्रह्मपुरी या रस्त्याने जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन वनविभातर्फे करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *