सरपंच व सदस्यांचे भाग्य ‘मशीन बंद’

भंडारा : जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी १६ आॅक्टोंबर रोजी मतदान पार पडले. यामध्ये भंडारा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ७२ उमेदवार व १२२ सदस्य पदासाठी ३२५ उमेदवारांचे भाग्य इव्हीएम मध्ये बंद झाले. मतदानाकरिता ६५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही निवडणुक होण्यापुर्वीच १० सदस्य अविरोध निवडून आले आहेत. भंडारा तालुक्यातील खराडी, परसोडी, राजेदहेगाव, खैरी पांदी, संगम/पुन, पिपरी/पुन, भोजापूर, केसलवाडा, खमाटा, सालेबर्डी, सिरसघाट/पुन., टेकेपार/पुन, तिड्डी, बोरगाव/बु., इटगाव/पुन, सुरेवाडा/पुन, तुमसर तालुक्यातील डोंगरी/बुज, पवनी तालुक्यातील गोसे/बुज, साकोली तालुक्यातील सिरेगावटोला या ग्रामपंचायतींमध्ये आज १६ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. सकाळी ७.३० वाजतापासून सुरू झालेल्या मतदानाला काहीवेळ उत्साह पहावयास मिळाला. तर दुपारी पावसामुळे अनेक मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया थंडावल्याचे दिसले. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान झाले. संपुर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता २४० कर्मचारी व ५४ पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या सोमवार १७ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात मतमोजणीच्या ठिकाणी भंडारा तहसील कार्यालयात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. सरपंच पदाकरिता थेट निवडणूक होत असल्याने ग्रामीण भागात या निवडणुकीची प्रचंड उत्सुकता होती. मतदारांनी आपला कौल कुणाला दिला हे सोमवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *