मत्स्य उद्योग जिल्ह्यात रोजगार निर्मितीचे मोठे क्षेत्र ठरेल!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यासाठी विशेष मत्स्य विकास आराखडा तयार करण्याचे काम शासन स्तरावर सुरू होणार आहे. येणा-या काळात मत्स्य उद्योग हा भंडारा जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीचे मोठे क्षेत्र जिल्ह्यातील तरुणांसाठी उभे करेल, असा विश्वास खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला. सनीज् स्प्रिंगडेल शाळेत युवकांसोबत आयोजित बैठकीत त्यांनी संवाद साधला. तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेला भंडारा येथे मत्स्य व्यवसाय विकासाच्या दृष्टीने योग्य आणि महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली पाहिजे. त्याकरिता तरुणांच्या सोबतीची गरज आहे. याच अनुषंगाने मत्स्य व्यवसाय विकासाच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील युवकांसोबत सकारात्मक बैठक व चर्चा करण्यात आली. या प्रसंगी आपण मत्स्य उद्योग वाढीकरिता काय काय करू शकतो, याची माहिती खा. मेंढे यांनी घेत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. प्रसंगी जिल्ह्यातील तरुणांनी मत्स्य व्यवसायाची माहिती घेऊन अतिशय व्यावसायिक पद्धतीने हा उद्योग करावा व याकरिता सर्व स्तरावर पाहिजे ते पाठबळ मिळेल. उद्योग उभे करा व आत्मनिर्भर व्हा, मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही खा. मेंढेनी उपस्थितांना दिली. यावेळी सुभाष उके, चतुर्भुज भानारकर, अनिल दिघोरे, संजीव भुरे, बाबूलाल भोयर, प्रवीण मडामे, रवींद्र उके व दिपक मारबते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *