शिकारीसाठी जंगलात लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यु

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जंगली जनावरांची शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात लावलेल्या विद्युत प्रवाहाला स्पर्श केल्याने दोन तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना देवरी तालुक्यातील परसटोला जंगलातील वन विभागाच्या झुडपी जंगला जवळील टेकडी परिसरात शनिवारी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत आशिष कोसरे वय २६ वर्ष व अनमोल गायकवाड वय २२ वर्षे दोघे रा. परसटोला ता.देवरी असे या घटनेतील मृतकांचे नाव आहे. याप्रकरणी देवरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परसटोला जंगल परिसरात शिकार करण्याच्या उद्देशाने लोखंडी तारेला विद्युत प्रवाह देऊन कुंपण करण्यात आले होते. रात्री जंगलात गेलेल्या या दोघा तरुणांना त्या तारेचा स्पर्श लागून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवरी पोलीस तपास करीत आहेत. रविवारी सकाळी दोन्ही मृतकांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय देवरी येथे करण्यात आल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्त करण्यात आले आहे. देवरी पोलिसाचे एक पथक परसटोला जंगलातील घटनास्थळी पुढील तपास करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिंगनजुळे यांनी दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *