जिल्ह्यात हत्तींच्या कळपाची एन्ट्री, मंगळवारी मोहघाटा व बरडकिनी वनक्षेत्रात प्रवास

नाजीम पाशाभाई-साकोली : दक्षिण पूर्व भारतीय जंगलातून प्रवासाला सुरुवात केलेल्या २३ वन्य हत्तींच्या कळपाने गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात वेळ घालवल्यानंतर अखेर सोमवारी रात्री भंडारा वनविभागात प्रवेश केला. गडचिरोली आणि गोंदियामध्ये ऑगस्टपासून राहणारा ३५ हत्तींचा समूह आता भंडारा येथील साकोली तालुक्यातील बरडकिन्ही जंगलात आहे. सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास भंडारा हद्दीत हत्तींचा कळप घुसला. भंडारा वनविभाग, गोंदिया वनविभाग, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, बंगाल येथील SAGE संस्थेच्या हत्ती तज्ञांच्या पथकाने या हत्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आहे.

साकोली वनपरीक्षेत्रातील सानगडी वनक्षेत्रात सोमवारी रात्री हत्तीच्या कळपाने एन्ट्री केली होती आज मंगळवारी हत्तीच्या कळपाने मोहघाटा नर्सरी ते किटाडी मुंडीपार/ सडक या जंगलव्याप्त क्षेत्रातून प्रवास केला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला लागून मोहघाटा नर्सरी व जंगल व्याप्त परिसरातून राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्याच्या हत्तीच्या कळपांच्या प्रयत्नाला वनविभागाच्या चमुने रोखण्यात यशस्वी प्रयत्न केले आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हत्तीचा कळप सानगडी वनक्षेत्रातील झाडगाव, केसलवाडा, सिरेगाव गावाशेजारील शेत शिवारात होता. शेतकऱ्यांनी शेतातील उभे धान पिक कापून त्याचे पुंजणे शेतात ठेवले होते. त्या पुंजणांची या हत्तीनी नाशधुश केली आहे. महसूल व वनविभाग नुकसानीचे पंचनामे करीत असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नरत आहे.
सोमवारच्या रात्री वळद परिसरातून सावरबंद कुंभली या परिसरातील शेत शिवारातील पिकांची नासधूस केल्याची माहिती आहे.

शेतात खरीप पिकांसह आता रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. हत्तीच्या कळपाने मोहघाटा, बरंडकिनी, किटाळी, मुंडीपार /सडक या गावांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
एकीकडे जिल्ह्यात हत्ती दाखल झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे या हत्तींच्या मार्गावर वसलेल्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. . वनविभागाच्या पथकांनी स्थानिक ग्रामस्थांना सहभागी करून परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. मोहघाटा, बरडकिनी ,गिरोला, कीटाडी, मुंडीपार /सडक, रेंगेपार कोहळी, रामपुरी, साकोली व लाखनी तालुक्यातील जंगल व्याप्त क्षेत्रातील सर्व ग्रामस्थांनी हत्तींच्या कळपापासून दूर राहण्याचे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे. हत्तींना हुसकावून लावताना लोकांचा जीव धोक्यात येण्याची भीती वन अधिकाऱ्यांना आहे.
विशेष म्हणजे हत्ती रात्रीच नुकसान करतात आणि दिवसा त्यांचे लोकेशन मिळत नाही. यामुळे वनविभागापुढे त्यांचे लोकेशन काढण्याचे मोठे आव्हान होते मात्र सकाळी मोहघाटा नर्सरी परिसरात हत्तीचे कळप दिसल्याने वन विभागाने सतत हत्तीच्या कळपांवर पाळत ठेवली आहे.

ड्रोनद्वारे केले जात आहे देखरेख

भंडाराचे उप वनसंरक्षक राहुल गवई म्हणाले की, गोंदिया आणि भंडारा वनविभाग आणि सेज संस्थेचे संयुक्त पथक थर्मल ड्रोनद्वारे हत्तींच्या हालचालींवर संयुक्तपणे लक्ष ठेवून आहेत. ग्रामस्थांनी सतर्क राहून वन अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन गवई यांनी केले आहे. भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा प्रशासनही सतर्क आहे. आजूबाजूच्या गावातील पोलीस पाटील, पटवारी यांना कळवण्यात आले आहे. गवई म्हणाले की, ग्रामस्थांनी महुआची फुले बाहेर सुकवू नयेत जेणेकरून जीवितहानी होणार नाही, ज्यांच्याकडे कायमस्वरूपी घर नाही त्यांनी महुआ कायमस्वरूपी घरात किंवा गोडाऊनमध्ये ठेवावी व वेळोवेळी मिळालेल्या सूचनांचे पालन करावे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *