मराठीच्या भाषा संवर्धनासाठी शाळा स्तरावर विविध कार्यक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येत आहे. याबाबत कार्यक्रम घेण्यासाठी भंडारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या दालनात नियोजन सभा घेण्यात आली. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या मुख्य धोरणास अनुसरुन मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यासाठी मुख्याध्यापकांची सभा उपशिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. सभेला शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप गणवीर, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवीचे मुख्याध्यापक राजू बांते, संत तुकाराम विद्यालय कणेरीचे मुख्याध्यापक प्रमोद धार्मिक, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक राधेश्याम धोटे, प्रकाश हायस्कूल कारधाचे मुख्याध्यापक माधव रामेकर, लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या सहायक शिक्षक स्मिता गालफाडे, जनता हायस्कूल तुमसरचे सहायक शिक्षक पंकज बोरकर यांची उपस्थिती होती. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ जानेवारी ते २८ जानेवारी या दरम्यान जिल्ह्यात शाळा स्तरावर मराठी वाचन कट्टा, कवी संमेलन, हस्तलिखित स्पर्धा, कथालेखन, अभिवाचन स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यानंतर तालुका स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तालुक्यातून दोन स्पर्धक जिल्हास्तरावर स्पर्धेत सहभागी केले जाणार आहे. मराठी भाषेचे संवर्धन या विषयावर तज्ञ वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या कार्यक्रमाबाबत अधिक अंतिम नियोजन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लिकर लवकरच करणार आहेत. शाळांनी मराठी भाषेचे संवर्धन उपक्रम स्पर्धाची तयारी करावी असे शिक्षणाधिकारी (माध्य) संजय डोर्लिकर यांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *