चौघ्या बहिणींनी गाजवला कुस्तीचा आखाडा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : चार सख्या बहिणींनी शालेय कुस्तीच्या क्रीडा स्पर्धात पहिल्यांदाच भाग घेतला. आधी तालुका नंतर जिल्ह्यात विविध गटात त्या खेळल्या. गादीवर खेळण्यात आलेल्या कुस्तीत त्या बहिणींनी मैदान गाजवला. कुस्ती स्पर्धेत चौघींनी प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्ह्यात दरारा निर्माण केला. ‘मुलींना खेळायला पाठवता, खेळण्याची काय गरज, मुली खेळून काय करणार’ असं ग्रामीण भागात हमखास बोललं जाते. पण, रोहणा गावाच्या प्रज्वली, प्रणयी, दीक्षु व प्रतिज्ञा राजू कहालकर या सख्या बहिणींनी लोकांच्या टीकेचे परिवर्तन प्रशंसनेत केले. रोहणा येथील एक नाही सहा मुलींनी जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत ‘दंगल’ (कुस्त्यांचा फड) गाजवून गावाला मान प्राप्त करून दिला. रोहणा हे गाव कुस्तीप्रेमींचे गाव म्हणून ओळखले जाते. याच गावात कुस्त्यांचा पाच वर्षापूर्वी महिला /पुरुष महाराष्ट्र केसरी कुस्तीचा आखाडा भरविण्यात आला होता. या मुलींनी त्या कुस्त्यांचे क्षण आपल्या डोळ्यांत साठवून घेतले. याच स्पर्धेतून त्यांना कुस्ती खेळण्याची प्रेरणा मिळाली. मग घरीच मॅटवर कुस्तीचे प्रशिक्षण सुरू झाले. प्रशिक्षक कोणी बाहेरचे नव्हते. त्या चार मुलींचे बाबांच प्रशिक्षक झाले. मुलींची ध्येय, आवड, जिद्द, चिकाटी आणि मेहनत बघून त्यांच्या बाबांनी मॅट घेवून आणल्या. मग नियमित घरीच सकाळ व सायंकाळी मॅटवर कुस्तीचे प्रशिक्षण सुरू झाले. प्रतीक्षा होती शालेय क्रीडा स्पर्धा होण्याची.

एकदाची शालेय स्पर्धा सुरू झाली अन त्या मुलींच्या चेहºयावर हास्य झळाळून आले. प्रथमच प्रज्वली ४३ किलोग्रॅम वजन गटात, प्रणयी ४० किलोग्रॅम वजन गटात, दीक्षु ३३ किलोग्रॅम वजन गटात व प्रतिज्ञा ३६ किलोग्रॅम वजन गटात तालुका व जिल्ह्यात कुस्तीच्या मॅटवर चारही बहिणी उतरल्या. अन तालुका व जिल्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांची वर्धा येथे होणाºया विभागीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रज्वली ही ११ वि ला जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे शिकत आहे तर प्रणयी ही ९ व्या वर्गात सुदामा विद्यालय मोहाडी येथे शिकत आहे.प्रतिज्ञा ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रोहणा येथे ६ वीत शिक्षण घेत आहे. महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथील मुख्याध्यापक राजू बांते, जेष्ठ शिक्षक हंसराज भडके, सहायक शिक्षक गजानन वैद्य, हितेश सिंदपूरे, शिखा सोनी, गोपाल मडामे, शोभा कोचे, मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे यांनी मुलींचे घरी जावून पुष्पगुच्छ व गौरव पत्र देवून कौतुक केले. आईवडिलांचे घरातून प्रोत्साहन व मानसिक बळ मिळाल्यामुळे यश मिळाल्याचे त्या बहिणींनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *