राज्याला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी क्रांतिकारक पाऊल-मुख्यमंत्री

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेली आर्थिक सल्लागार परिषद ही महाराष्ट्राच्या दृष्टीने क्रांतीकारक पाऊल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेची पहिली बैठक झाली.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बैठकीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टाटा सन्सचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन उपस्थित होते ही बैठक महाराष्ट्राला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी महत्वपुर्ण असल्याचे सांगत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी ही बैठक क्रांतीकारक ठरेल. राज्यातील सर्व विभागांचा समतोल विकास होण्यासाठी या परिषदेत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर पर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ह्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका निर्णायक आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठीअर्थव्यवस्था असणारे राज्य असून महाराष्ट्राच्या सहभागाने पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यास मोठी मदत होणार आहे.

त्यादृष्टीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ही परिषद महत्त्वपूर्ण आहे. आर्थिक विकासाबरोबरच, शेती, शेतकरी त्यातील प्रत्येकाच्या राहणीमानाचा विचार ही परिषद करणार आहे. सामान्य माणूस हाच विकासाच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असणार आहे. शेती क्षेत्रातील उत्पादन वाढ, तंत्रज्ञानाचा वापर, वित्तपुरवठा याबाबत परिषद अभ्यास करून सूचना, शिफारशी करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *