भोंदू बाबाने भाजप नेत्याचे ४.५० लाखांचे सोने लुटले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : सकाळी सायकलवरून फिरण्यासाठी गेलेले भाजप नेते रमेश मंत्री यांना थांबवून आरोपींनी अघोरी बाबा असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडील सोन्याची चेन, माणिक खडा असलेली अंगठी असा ४.५० लाखांचा मुद्देमाल घेऊन फरार झाले. ही घटना सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास घडली. भाजपचे नेते रमेश माणिकलालजी मंत्री (वय ७०, मंत्री सदन, शिवाजी नगर) हे शनिवारी सकाळी ६.२० वाजता सायकलने सेमिनरी हिल्स येथे फिरण्यासाठी जात होते. दरम्यान, धरमपेठ येथील पॅन्टालून मॉलसमोरील रोडवर त्यांच्या सायकलसमोर पांढºया रंगाची आॅल्टो कार येऊन थांबली. त्या गाडीत मागे अंदाजे ४० ते ४५ वर्ष वयाचा एक गोरा व मध्यम बांध्याचा काळे कपडे घातलेला व्यक्ती आणि समोर ड्रायव्हर व बाजूला २५ ते ३० वयोगटांतील एक युवक होता. यावेळी ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या व्यक्तीने मंत्री यांना जवळपास मंदिर व अंघोळीची व्यवस्था आहे काय? अशी विचारणा केली.
तसेच काळे कपडे घातलेले अघोरी बाबा असून, त्यांचे दर्शन घेण्यास सांगितले. मंत्री हे भोंदू अघोरी बाबाचे दर्शन घेत असताना आरोपीने त्यांना १० रुपयांची नोट मागितली. ती नोट मंत्रयुक्त करण्याचा बहाणा करून नोट मंत्री यांना परत दिली. त्यानंतर त्यांच्या हातातील घड्याळही मंत्र म्हणून फुंक मारून परत केली. त्यानंतर मंत्री यांच्या गळ्यातील सोन्याची पेंडंट असलेली ५० ग्रॅमची चेन व हातातील माणिक खडा असलेली अंगठी मंत्र मारण्याचा बहाणा करून घेतली. आरोपी कारसह पळून जाण्याच्या तयारीत असताना मंत्री यांना कारचा धक्का लागल्याने ते खाली पडून जखमी झाले. आरोपींनी त्यांची चेन व अंगठी असा ४.५० लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. मंत्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *