नवेगाव-नागझिरा अभयारण्याला वाघ मिळणार!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया-भंडारा या जिल्ह्यांना मोठे वन वैभव लाभले आहे. येथील वने वाघांसाठी संरक्षित समजली जातात. ते नवेगाव नागझिरा अभयारण्यातील वाघांच्या संख्येवरून दिसून येते. परंतु अलीकडच्या काळात वन्यजीव शिकार व मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राण्यांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व्याघ्र संवर्धन काळाची गरज आहे, ही गरज हेरून नवेगाव-नागझिरा वन्यजीव प्रकल्पात ६ वाघ सोडण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावातील पहिल्या टप्प्यातील २ वाघ लवकरच नवेगाव नागझिरा अभयारण्याला मिळणार आहेत. तसे सुतोवाच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अर्थ, नियोजन, सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तिरोडा येथील एका कार्यक्रमात दिले होते. आता शासन स्तरावरून हे वाघ नवेगाव-नागझिरा अभयारण्यात सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प ६५३ चौरस किमी क्षेत्रात पसरला आहे. त्यात जिल्ह्यातील जंगलाच्या दृष्टीकोणाने चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलातून आणखी ६ वाघिणी घेऊन येण्याचा प्रयत्न नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा आहे. यात मानवी संपर्क किंवा कोणत्याही व्यक्तीवर हल्ला केला नाही अशा वाघिणींचा शोध मागील एक वर्षापासून घेण्यात येत आहे. त्यात ६ वाघिणी अभ्यासात आढळून आल्या आहेत. तर टप्या-टप्यात या वाघिणी जिल्ह्यातील जंगलात सोडण्यात येणार आहेत. यानुसार पहिल्या टप्प्यात २ वाघिणी आणण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळालेली आहे. नवेगाव-नागझिरा अभयारण्यात ३ वर्षापेक्षा मोठ्या वयाच्या १० वाघांचा अधिवास असून तेवढ्याच संख्येत छाव्यांचेही अस्तित्व असल्याची माहिती आहे. आता पुन्हा ६ वाघांची भर पडणार असल्याने हा कॅरीडोर अधिक सक्षम करण्याची गरज व्याघ्र, निसर्ग, वन्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे. विदर्भाची व्याघ्रप्रदेश म्हणूनच ओळख आहे. ज्या पर्यटकांनी वाघ बघितला नाहीत्यांना विदर्भातील अभयारण्यात हमखास व्याघ्र दर्शना होते, असे म्हटले जाते. गोंदिया, भंडारा जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असलेल्या नवेगावनागझिरा अभयारण्य व्याघ्र दर्शनासाठी ओळखला जातो.                             दशकभरात जवळपास एक डझन वाघांचा मृत्यू व शिकार झाल्याची माहिती आहे, असे असताना देखील गोंदिया, भंडारा जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली आहे. वाघांच्या अधिवासासाठी येथील पोषक वातावरण सांगितले जाते. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जंगल मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दूवा आहे. नागझिरा ते पेंच, नागझिरा-नवेगाव-ताडोबा, नागझिराउमरेड, पवनी, कºहांडला अभयारण्य असा एक कॅरिडोर आहे. आता ६ वाघांची त्यात भर पडणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन मादी वाघांना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. सन २०२१ च्या प्राणी गणनेनुसार नवेगाव-नागझिरा प्रकल्पात २२ वाघांचे अधिवास असल्याचे सांगितले जाते. यात विशेषत: मोठे ३ नर, ७ माद्यांचा समावेश आहे. तीन वषार्खालीलचे १० ते ११ छोट्या छाव्यांचा अधिवास आहे.

व्याघ्र संरक्षणातून वाघांची संख्या वाढविण्यात वनविभागासह वन्यजीव विभागाला यश आले आहे. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानांचे संरक्षण करण्यासह व्याघ्र संवर्धनासाठी नागरिकांचे सहकार्यही आवश्यक आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ४-५ वाघ सोडले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २ वाघांचा समावेश आहे. ही प्रक्रीया यशस्वी झाल्यानंतर इतर वाघांना टप्प्या-टप्प्याने आणून सोडण्यात येणार असल्याचे नवेगाव-नागझिरा प्रकल्पाचे उपसंचालक पवन जेफ यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *