आला उन्हाळा, तब्येत सांभाळा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : होळी पार पडली की उन्हाळा सुरू झाला असे मानले जाते. होळीमध्ये थंडी जळून जाते. मग उरते ती केवळ उष्णता. ही उष्णता शरीरातही वाढते आणि बाहेरदेखिल. म्हणून शरीराची काळजी दोन्ही बाजूंना घ्यावी लागते. भारतासारख्या देशात उन्हाळा अतिशय कडक असतो. त्यातही विविध छटा असतात. समुद्रकिनारी, मुंबईतील उन्हाळा घामेघाम करणारा तर विदर्भातील उन्हाळा चटके देणारा. हा चटके देणारा उन्हाळा माणसाला उष्माघातापर्यंत नेतो. म्हणूनच उन्हाळ्यात खूप काळजी घ्यावी लागते. ही काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन सर्वांना माहीत असले पाहिजे, कारण नेहमीच्या जीवनशैलीतच बदल करावा लागतो. उन्हात फिरण्याचे टाळणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहील यासाठी प्रयत्न करणे, हाच उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. मात्र उन्हातून फिरण्याची वेळ आल्यास डोळे, डोके व शरीर यांना संरक्षण देणे गरजेचे आहे; तसेच उन्हातून फिरून आल्यानंतर थंड पेय लगेच पिण्याचे टाळावे. उन्हाळा जाणवू लागला आहे. दुपारी अंगाची काहिली होत आहे. काहीवेळा ग्लानी आल्यासारखे वाटते. डोळ्यात काही वेळा लाली येऊन ते चुरचुरल्यासारखे वाटतात. त्यामुळे प्रत्येकानेच स्वत:हून काळजी घेणे गरजेचे आहे. महत्त्वाचे व आवश्यक काम असल्याशिवाय उन्हातून घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर पडताना पातळ, सुती, फिक्या किंवा पांढºया रंगाचे कपडे वापरावेत. डोक्याला टोपी डोळ्यांना गॉगल असावा.
उन्हाच्या झळा लागू नयेत यासाठी संपूर्ण अंग झाकणारे असावेत. तिखट, खूप गरम, रूक्ष असे पदार्थ टाळावेत. दही, लस्सी वर्ज्य करावी; मात्र ताक भरपूर प्यावे. कैरीचे पन्हे, कोकम सरबत, लिंबूचे सरबत, शहाळ्याचे पाणी प्यावे. उसाच्या रसात किंवा कोणत्याही पेयात बर्फ टाकून घेऊ नका. हा बर्फ औद्योगिक वापरासाठी म्हणजे एखादी वस्तू बाहेरून थंड करण्यासाठी तयार केलेला असतो. तो पेयात वापरला तर त्यापासून आजार होऊ शकतात. पाणी शक्यतो उकळून प्या. ताप आल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या, मुलांना सुटीत पोहण्याच्या तलावावर पाठवण्याआधी विषमज्वर प्रतिबंध लस देणे आवश्यक आहे. तसेच तीन-चार जणांच्या गटाने मुलांना पोहायला पाठवावे. खूप गर्दीच्या तलावांवर पोहण्याचे टाळावे. घरात, कामच्या ठिकाणी थंडावा निर्माण होईल, अशी व्यवस्था असावी. थंड पाण्याने स्नान करावे. दुपारी अर्धा तास झोप घ्यावी. उन्हाळ्यात खूप घामाघूम करणारा व्यायाम प्रकार करू नये. मात्र सकाळी हिरवळीवर अनवाणी किंवा सायंकाळी झाडांच्या सावलीतून चालण्याचा, पोहण्याचा व्यायाम केला तरी चालेल. ढोबळी मिरची, कारले, मेथी आदी भाज्या टाळाव्यात.
उष्णतेचा त्रास जाणवल्यास कांद्याचा रस, गुळवेल सत्व, गुलकंद, मोरावळा, दुर्वांचा रस, यांचे सेवन करावे. रात्री झोपताना कपाळावर चंदन उगाळून लेप लावावा. कलिंगड, काकडी, व कोहळ्याचा पेठा खाणे. उत्तम ठरेल. उन्हाळ्यात घामोळे येते. खाज आल्याने सहजपणे ते खाजविले जाते. काहीवेळा त्यातून रक्त येते. कुशीतील त्वचा कोरडी व उष्ण असते. तेथे घामोळे आले असेल, तर ‘कोनाइट’ हे औषध उपयोगी पडते. घामोळ्यांचा दाह होत असल्यास ‘एपिस मेल’ हे औषध आणि लहान मुलांना ‘चामोमिला’ हे औषध उपयोगी आहे. ही औषधे वैद्यकीय सल्ल्यानंतर घ्यावीत. उन्हाळ्यात कावीळ, प्रामुख्याने विषमज्वर, कावीळ, गॅस्ट्रो यांसारखे रोग होऊ शकतात. त्यांची लागण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उघडयावरील तसेच शिळे अन्न खाऊ नये. घरी जेवतानाही आहार हलक्या स्वरूपाचा ठेवावा. त्यामध्ये दूध, दही, ताक, फळे आणि कोथिंबीर यांवर भर द्यावा. तिखट, तेलकट अन्न टाळावे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.