निधीअभावी घरकूल योजनेपासून लाभार्थी वंचित

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : गत दोन वर्षांपासून निधी न मिळाल्याने पवनी तालुक्यातील इतर मागासवर्गीय गरीब घरकुलांचे घराचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. घरकूल लाभार्थ्यांना सन २०२२-२३ चे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने पंचायत समिती पवनीमार्फत गावोगावी घरकूल बांधण्याचे काम थंडबस्त्यात आहे. घरकूल ‘ड’ यादीत नाव आहे. मात्र, निधी न मिळाल्याने काम रखडले आहे. गेल्या पावसात अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, घरांची छप्परे उडून गेली. असे गरीब लोक आपल्या कुटुंबासाठी ग्रामपंचायतीच्या फेºया मारत आहेत. आम्ही लोकप्रतिनिधींनाही विनंती करीत आहोत. पण, उपयोग नाही. पावसाळा सुरू होत आहे. निवासाचा प्रश्न आहे. पंचायत समितीकडून निधी न मिळाल्याने ही योजना पांढरा हत्ती ठरली आहे.

पंचायत समितीमार्फत प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आदिवासी आवास योजना, रमाई आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येत आहेत. घरकूल योजनेची रक्कम कमी आहे. घर बांधण्यासाठी ४ टप्प्यांत १ लाख ४५ हजार रुपयांचा निधी दिला जातो. घरांच्या बांधकामासाठी साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याने हा निधी कमी पडत आहे. निधी वाढविण्याची गरज आहे. पावसाळा सुरू होत आहे. अशावेळी आवास योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *