५०० रुपयांच्या कोट्यवधी नोटा गायब नाहीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : नाशिक, देवास आणि बंगळुरू येथील छापखान्यांतून ५०० रुपयांच्या कोट्यवधी नोटा गायब झाल्याचे वृत्त भारतीय रिझर्व्ह बँकेने फेटाळत स्पष्टीकरण दिले आहे. ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे वृत्त चुकीचे आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. नाशिक, देवास आणि बंगळुरूमधील छापखान्यांतून पाचशे रुपयांच्या १,७६१ दशलक्ष नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेत पोहोचण्याआधीच लंपास झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या कालावधीत रघुराम राजन हे गव्हर्नर होते; पण त्यानोटांवर स्वाक्षरी कोणाची होती, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गायब झालेल्या सर्व नोटा नवीन डिझाईनच्या असून, त्याचे मूल्य ८८० अब्ज ३२ कोटी ५० लाख रुपये इतके आहे. छपाई केलेल्या नोटांपैकी ७,२६० दशलक्ष इतक्याच नोटा पोहोचल्याअसल्याचे खुद्द रिझर्व्ह बँकेनेच उघड केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत खळबळ उडाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मनोरंजन रॉय यांनी आरटीआयअंतर्गत काही प्रश्न विचारून माहिती मागवली होती. त्या माहितीच्या विश्लेषणानुसार आरबीआयकडे नोटा पोहोचण्यापूर्वीच गायब झाल्या आहेत, अशी माहिती समोर आल्याचे वृत्तात म्हटले होते.

मात्र, या आरटीआयमधील माहितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. त्यामुळे हे वृत्त पसरले. चुकीचा अर्थ काढण्यात आल्याने हा गैरसमज निर्माण झाला. प्रिंटिंग प्रेसमध्ये छापलेल्या नोटा पूर्णपणे सुरक्षित आहेत, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. बँक नोटांचे उत्पादन, साठवणूक आणि वितरण यावरील मानक संचालन प्रक्रियांचे रिझर्व्ह बँकेकडून पालन केले जाते आणि यासाठी एक मजबूत यंत्रणा आहे. आरबीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश्वर दयाल यांनी म्हटले की, अशा कोणत्याही माहितीसाठी सर्वांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *