चंद्रपूरहून नवजात बाळ चोरी करणाºया महिलेला हिंगणघाटमध्ये अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी हिंगणघाट : चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून एका नवजात अर्भकाला पळवून नेल्याप्रकरणी आज २० रोजी पोलिसांनी हिंगणघाट येथील एका महिलेस ४ दिवसीय नवजात अर्भकासह अटक केली. ती महिला स्थानिक हनुमान वॉर्ड येथील रहिवासी असून आज सकाळी १०.३० वाजता तिने हे अर्भक घेऊन हिंगणघाट येथे पळ काढला होता. मिळालेल्या माहितीनुसार, नवजात अर्भकास कोणी अज्ञात महिलेने पळविले असल्याचे लक्षात आल्यानंतर बाळंतीण माता मीना अंकित धात्रक रा. माढेळी ता. वरोरा हिने रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली. या घटनेची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांच्या कानी घातल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवली.

तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांना महिलानवजात अर्भकाला घेऊन पळ काढताना दिसली. पुढे तपास केला असता ती महिला चंद्रपूर बस स्थानकावरून हिंगणघाट येथे निघाली असल्याचे बसस्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांच्या ध्यानात आले. चंद्रपूर पोलिसांनी विलंब न करता हिंगणघाट बसस्थानक गाठले. येथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून सदर महिला हिंगणघाटला आल्याची खात्री पटली. दरम्यान, हिंगणघाट पोलिसांची मदत घेऊन तिचे निवासस्थान गाठत तिला नवजात अर्भकासह ताब्यात घेतले. सदर महिला आरोपी स्थानिक हनुमान वार्ड परिसरातील दुतोंड्या नळाजवळ राहत जेबा सुभान शेख (२६) असे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या ४ तासातच बाळंतीणीस तिच्या पोटच्या अपत्याला मातेच्या कुशीत दिले. चोरी गेलेल्या नवजात अर्भकाला पोलिसांनी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असून बाळ सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.